सेंद्रिय शेतीतून सत्कर्म साधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:38 AM2020-12-16T04:38:39+5:302020-12-16T04:38:39+5:30
म्हाकवे : सर्वांचे आरोग्य हे शेतकऱ्यांच्या हाती आहे. आपण समाजाचे देणे लागतो, या उदात्त भावनेतून निष्ठा आणि प्रामाणिकपणे ...
म्हाकवे : सर्वांचे आरोग्य हे शेतकऱ्यांच्या हाती आहे. आपण समाजाचे देणे लागतो, या उदात्त भावनेतून निष्ठा आणि प्रामाणिकपणे आपला शेती व्यवसाय करावा. आपण करीत असलेला दानधर्म कोणत्याही राजापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्यामुळे आरोग्यदायी समाजनिर्मिती आणि जमिनीच्या शाश्वतीसाठी तंत्रज्ञान आत्मसात करीत सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन सत्कर्म साधावे, असे आवाहन सेंद्रिय शेती व देशी गायींचे पुरस्कर्ते, कृषितज्ज्ञ अनिल कुलकर्णी (कऱ्हाड) यांनी केले. यासाठी देशी गायींचे संगोपन महत्त्वाचे आहे.
कौलगे (ता. कागल) येथे परिवर्तन सामाजिक विकास संस्था, नानीबाई चिखली येथील कै. रावसाहेब भोसले सहकारी पतसंस्था यांच्याद्वारा आयोजित सेंद्रिय शेती कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षपदी ‘परिवर्तन’चे मुख्य प्रवर्तक सचिन पवार होते. दीपप्रज्वलन देशी गोपालक पांडुरंग कुंभार यांच्या हस्ते झाले.
तानाजी पाटील यांनी स्वागत, मधुकर भोसले यांनी प्रास्ताविक केले. संदीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रसाद गाजरे, विजयसिंह भोसले, पुणे परिवर्तनचे अभिजित घुले, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, आदी उपस्थित होते. के. बी. चौगुले यांनी आभार मानले.
बळिराजा दातृत्वाचा ‘झरा’
शेतात गेल्यानंतर जे उपलब्ध असेल ते भरभरून देण्याचे दातृत्व केवळ शेतकऱ्यांकडे असते. खळ्यावर किंवा दारात आलेल्या भिक्षुकाला तो पसाभर धान्य देतो. शेतकरी हा हुशार आहे. येणारा काळ हा उत्तम शेतीचाच असेल; त्यामुळे सुशिक्षित तरुणांनी शेतीची सूत्रे हातात घेऊन कमी खर्चात अधिक उत्पन्नाची कास धरावी, असे आवाहनही कुलकर्णी यांनी केले.