जुन्या रेखांकनाप्रमाणेच महामार्गाचे काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:22 AM2021-04-06T04:22:19+5:302021-04-06T04:22:19+5:30
वडणगे : नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या नवीन रेखांकनामुळे करवीर तालुक्यातील केर्ली, केर्ले, पडवळवाडी तसेच पन्हाळा तालुक्यातील कुशिरे या गावांतील शेतकऱ्यांची ...
वडणगे : नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या नवीन रेखांकनामुळे करवीर तालुक्यातील केर्ली, केर्ले, पडवळवाडी तसेच पन्हाळा तालुक्यातील कुशिरे या गावांतील शेतकऱ्यांची पिकाऊ शेती, विहिरी, बोअरवेल, पाणीपुरवठा योजना व घरे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांनी १४ फेब्रुवारी २०१७ च्या जुन्या रेखांकनाप्रमाणे रस्त्याचे काम व्हावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या गावांतील शेतकऱ्यांनी दिला आहे. नवीन रेखांकनाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शंभरांवर शेतकरी उपस्थित होते. ४ जानेवारी २०२१ रोजी नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे नवीन रेखांकन करण्यात आले आहे. त्यामुळे या चार गावांतील ३५ विहिरी, २५ बोअरवेल, १०० घरे तसेच २५० एकर बागायत जमिनीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आमचा रस्त्याच्या कामास विरोध नसून सध्याच्या नवीन रेखांकनास विरोध आहे, अशा तीव्र भावना या गावांतील शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
नवीन रेखांकनाप्रमाणे केर्लीतील पाण्याचा स्रोत असणाऱ्या रस्त्याशेजारील दहा ते अकरा विहिरी व दोन-तीन बोअरवेल नष्ट होणार आहेत. त्यामुळे साठ ते सत्तर टक्के शेतकरी भूमीहीन होणार आहेत. संपूर्ण पिकाऊ जमीन महामार्गात जाणार असल्याने या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनणार आहे. त्याकरिता जुन्या रेखांकनाप्रमाणे महामार्गाचे काम केल्यास बहुतांशी जमिनी वाचणार आहेत. केर्ले, पडवळवाडी गावांची स्थितीही हीच आहे.
पन्हाळा तालुक्यातील कुशिरे येथील ज्योतिर्लिंग पाणीपुरवठा संस्थेचे याच मार्गातून पंपिंग स्टेशन, पाणीपुरवठ्याचे नळ आहेत. या संस्थेच्या योजनांमुळे येथील सुमारे पाचशे एकर जमीन ओलिताखाली येते. नवीन रेखांकनामुळे येथील शेतकऱ्यांचाही प्रश्न गंभीर बनणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनीही यावेळी नवीन रेखांकनाला कडाडून विरोध केला.
शेतकऱ्यांचा विकासकामाला कोणताही विरोध नसून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन मार्ग काढणे करणे गरजेचे आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बागायत जमिनीतून हा मार्ग करण्यापेक्षा डोंगराळ भागातूनच करावा, अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली.