पीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम प्रभावीपणे करा : दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:12 AM2019-04-27T11:12:19+5:302019-04-27T11:28:15+5:30
यंदाच्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करण्याबरोबरच पीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केली.
कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करण्याबरोबरच पीक गुणवत्ता नियंत्रणाचे काम अधिक सक्षमपणे व प्रभावीपणे करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहामध्ये जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वआढावा बैठक ीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा परिषदेचे कृषिविकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी महाविद्यालयाचे डॉ. मोहिते, ‘नाबार्ड’चे नंदू नाईक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने उपस्थित होते.
ते म्हणाले, यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात चार लाख हेक्टर क्षेत्र निश्चित केले असून यामध्ये सोयाबीन, भुईमूग, नाचणी, ज्वारी अशा महत्त्वाच्या पिकांचा अंतर्भाव आहे. पीक उत्पादकता वाढविण्यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या काटेकोर नियोजनासोबतच पावसास होणारा विलंब अथवा प्रमाणाबाहेरचा अधिक पाऊस या गोष्टींचा विचार करून तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्याबाबतचे नियोजन व आराखडा तयार ठेवावा.
हुमणी/अमेरिकन लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी व जनजागृतीसाठी ठिकठिकाणी सर्कलनिहाय शेतकऱ्यांसाठी कार्यशाळांचे नियोजन करावे व तसा नियोजन आराखडा सादर करावा. हुमणीवरील उपाययोजनेबाबत जनजागृतीसाठी ग्रामपंचायतीमध्ये माहितीफ्लेक्स लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आपली शेती ही डोंगराळ भागामध्ये जास्त असल्याने मिनी शुगरकेन हार्वेस्टिंगचा विचार व्हावा व कृषिपूरक उद्योग-व्यवसायाचाही विचार व्हावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
अमन मित्तल म्हणाले, शेतीसाठी पाणी व रासायनिक खतांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे आरोग्यास हानी पोहोचत असल्याचे दिसून येत असल्याने सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे.
गटशेतीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन पीक उत्पादकतेचा विचार करणे आवश्यक आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. उपसंचालक भाग्यश्री पवार यांनी सूत्रसंचालन केले.