पॉझिटिव्ह रेट कमी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:18 AM2021-07-16T04:18:28+5:302021-07-16T04:18:28+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह दर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पूर्वतयारी करावी ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह दर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पूर्वतयारी करावी व नागरिकांचे वेगाने लसीकरण करावे, अशा सूचना केंद्रीय आरोग्य पथकाने गुरुवारी जिल्हा प्रशासनाला केल्या.
राज्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना संसर्ग अजूनही कमी झालेला नाही, याचा आढावा घेण्यासाठी राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, उपसंचालक डॉ. प्रणील कांबळे, प्रादेशिक कार्यालय आरोग्य व कुंटुब कल्याण विभागाचे डॉ. सत्यजित साहू यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय आरोग्य पथक गुरुवारी कोल्हापुरात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. यावेळी नूतन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.
डॉ. आवटे म्हणाले, येथील संभाव्य पूरपरिस्थिती पाहता बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करावे. लसीकरण झालेल्या नागरिकांचे आरोग्य यंत्रणेकडून विश्लेषण करण्यात यावे. कोविडमध्ये काम करणाऱ्या ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे त्यांची यादी पथकाला द्यावी. डॉ. कांबळे यांनी पॉझिटिव्हिटी दर कमी येण्यासाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे अशी सूचना केली.
आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी लस वाया जाऊ नये व लसीचा पुरेपूर वापर व्हावा, यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी उपलब्ध लसींपैकी ९० टक्के लस दुसऱ्या डोससाठी व १० टक्के लस नव्याने डोस घेणाऱ्यांसाठी देण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी जिल्ह्याची कोरोना स्थिती सांगितली.
---
लसीची मागणी
प्रशासनाने रोज ५० हजार नागरिकांचे लसीकरण होईल, इतकी यंत्रणेची तयारी आहे मात्र लसीचा पुरवठा होत नसल्याचे सांगत अधिकाधिक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केली. यावर डॉ. आवटे यांनी लसीसाठी राज्य पातळीवर केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत लसीकरणामध्ये राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
----
फोटो नं १५०७२०२१-कोल-कोरोना आढावा बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी केंद्रीय आरोग्य पथकाने जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला यावेळी उपसंचालक प्रणील कांबळे, डॉ. प्रदीप आवटे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.