केंद्रीय किचन पद्धत स्वीकारू नका, पोषण आहार कामगार संघटनेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 04:44 PM2019-05-17T16:44:56+5:302019-05-17T16:46:47+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासंदर्भात येऊ घातलेली केंद्रीय किचन पद्धत रद्द करावी आणि पूर्वीप्रमाणेच बचत गट तसेच सध्या काम करणाऱ्या महिलांनाच काम देण्याच्या मागणीकरिता शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी बचतगटांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासंदर्भात येऊ घातलेली केंद्रीय किचन पद्धत रद्द करावी आणि पूर्वीप्रमाणेच बचत गट तसेच सध्या काम करणाऱ्या महिलांनाच काम देण्याच्या मागणीकरिता शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी बचतगटांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली.
महानगरपालिकेच्या सर्व शाळांतून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यासंदर्भात शासकीय स्तरावर दबाव आणला जात आहे. यापूर्वीच महापालिका सर्वसाधारण सभेत अक्षयपात्र संस्थेला आहार पुरविण्याचे काम देण्यासंदर्भातील प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. मात्र शासनाकडून ‘अक्षयपात्र’ला ठेका देण्याबाबत सतत विचारणा होत आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा काढून महापौर, उपमहापौर यांना निवेदन देण्यात आले.
महापौर मोरे व उपमहापौर शेटे यांनी मोर्चाला सामोरे जाऊन त्यांचे म्हणणे ऐकले. तसे निवेदन स्वीकारले. केंद्रीय किचन पद्धत स्वीकारून ‘अक्षयपात्र’ला ठेका देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच नामंजूर केला असून, आम्ही तुमच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही त्यांनी मोर्चेकऱ्यांना दिली. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष प्राचार्य ए. बी. पाटील, शहराध्यक्षा वर्षा कुलकर्णी, शहर सेक्रेटरी अश्विनी साळोखे यांनी केले.