अकरावी प्रवेशापासून वंचित राहू नये

By admin | Published: June 10, 2015 12:24 AM2015-06-10T00:24:04+5:302015-06-10T00:25:51+5:30

एम. के. गोंधळी : विद्यार्थ्यांना नियमाने प्रवेश द्या; शाळा प्रवेशाच्या बैठकीत आवाहन

Do not be denied access to eleven entrants | अकरावी प्रवेशापासून वंचित राहू नये

अकरावी प्रवेशापासून वंचित राहू नये

Next

कोल्हापूर : सर्व विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश मिळावा, यासाठी संस्थाचालक, प्राचार्यांनी सकारात्मक राहावे. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, असे आवाहन विभागीय उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी मंगळवारी केले. काही शिक्षण संस्थाचालकांनी शाळेतच पुस्तके, गणवेश, वह्या यांची दुकानदारी मांडली आहे. असा ‘साईड बिझनेस’ करीत असलेल्या शिक्षणसंस्थांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेनेच्या मागणीनुसार येथील मेन राजाराम हायस्कूलमध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योस्त्ना शिंदे, शिक्षण निरीक्षक ए. आर. पोतदार, प्रशासनाधिकारी पी. एस. सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
गोंधळी म्हणाले, कोल्हापुरातील अकरावीसाठीची केंद्रीय प्रवेश परीक्षा राज्यात आदर्श ठरली आहे. अन्य जिल्ह्यात कोल्हापूरच्या प्रवेश प्रक्रियेचे अनुकरण केले जात आहे. यंदाही नियोजनबद्ध प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व खासगी शाळांनी २५ टक्के प्रवेश मोफत देणे बंधनकारक आहे. २५ टक्क्यांमधून येथे प्रवेश दिले जातील, असा मोठा फलक शाळांनी लावावा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे अधिकाधिक प्रवेश होतील, याकडे लक्ष द्यावे.
इचलकरंजी, सांगली येथून पुस्तक विके्रत्यांनी निवेदन देऊन, काही शिक्षणसंस्थांनी शालेय साहित्याची दुकानदारी सुरू केल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे विभागातील सर्व जिल्ह्यांंतील शिक्षण संस्थांची तपासणी करण्याचे आदेश दिले. बालकांना मोफत व हक्काचे शिक्षण कायद्यातील निकषानुसार सेवा-सुविधा द्याव्यात, असे आदेश शिक्षण संस्थांना दिले. महत्त्वाचे दहा निकष पूर्ण न करणाऱ्या संस्थांवर कारवाई करणार आहे. शासन आता वेतनेतर अनुदान देत आहे. शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांचे वेतनेतर अनुदान रोखले जाईल. शासनाने नोकरभरतीवर निर्बंध आणले असले तरी आवश्यक तेथे शिक्षकभरती करण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे सकारात्मक आहेत.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, शासनाचे नियम न पाळणाऱ्या मुजोर शिक्षणसंस्थांचे कामकाज शिवसेना बंद पाडणार आहे. भरमसाठ देणगी उकळणाऱ्या आणि दर्जेदार सुविधा न देणाऱ्या संस्थांचाही बुरखा फाडणार आहोत.
शिक्षण निरीक्षक ए. आर. पोतदार यांनी, अकरावीच्या प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नये, असे सांगितले. प्राचार्य बी. बी. शिंदे, शिवाजी भोसले यांची भाषणे झाली. सौ. एस. बी. शिंदे, एम. ई. सातपुते, ग्राहक संरक्षण मंचचे कमलाकर जगदाळे, आदी उपस्थित होते.


निवेदनास मज्जाव...
बैठक सुरू असताना शिक्षण उपसंचालक गोंधळी यांना निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे फिरोज सरगूर व्यासपीठाकडे आले. त्यांना निवेदन देण्यापासून शिवसेनेचे पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मज्जाव केला. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. सरगूर हे निवेदन न देताच गेल्याने गोंधळ शांत झाला.

Web Title: Do not be denied access to eleven entrants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.