सक्ती नको, विधायकतेतून करा गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:48 AM2017-07-21T00:48:29+5:302017-07-21T01:06:08+5:30

पोलीस अधीक्षकांच्या सूचना : श्रावणषष्ठी यात्रेचेही नियोजन; पोलीस आढावा बैठकीत चर्चा

Do not be forced, do Ganesh festival | सक्ती नको, विधायकतेतून करा गणेशोत्सव

सक्ती नको, विधायकतेतून करा गणेशोत्सव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क-कोल्हापूर : विधायक कामांतून कोल्हापूरचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरावा. असा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा. हा उत्सव सक्तीने नव्हे तर एकमेकांच्या विश्वासाने, पारंपरिकतेने व उत्साहात साजरा करण्याबाबत पोलिसांच्या आढावा बैठकीत नियोजन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी गुरुवारी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत गणेशोत्सवासह जोतिबा डोंगरावरील श्रावणषष्ठी यात्रेबाबतच्या नियोजनावरही चर्चा करण्यात आली. ही बैठक पोलीस मुख्यालयात झाली.
आॅगस्टमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवात कोल्हापुरातील मंडळांनी विविध विधायक उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा. जमा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या वर्गणीचा विनियोग हा स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्रे, परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी लोकसहभागातून सीसीटीव्ही बसविणे, पाण्याचे बंधारे बांधणे, अनाथ मुलांना दत्तक योजना राबविणे, गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलणे, हेल्मेट जनजागृती, आदी बाबींवर खर्च करण्यात यावा. या विधायकतेच्या नव्या पावलांमुळे कोल्हापूरचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरल्याशिवाय राहणार नाही, असे पोलीस अधीक्षक मोहिते म्हणाले.
कोल्हापूरचा गणेशोत्सव हा सर्वांचाच आहे. तो उत्साहानेच झाला पाहिजे. त्यासाठी कोणाच्या उत्साहावर बंधने लादू नका, अशा सूचना यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. पोलिसांनी जनतेत मिसळून, गणेशोत्सवातील मंडळांना विश्वासात घेऊन काम करावे. गणेशोत्सवात कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्यात उगाचच रस्सीखेच नको, अशाही सूचना देण्यात आल्या. विधायक कार्यातून गणेशोत्सवात जास्तीत-जास्त मंडळांनी बक्षिसे मिळवावीत. यातून जास्तीत जास्त समाजसेवक तयार करण्याबाबतही चर्चा झाली.
गणेशोत्सव मंडळांनी या उत्सवात विधायक कार्यात स्वत:हून पुढाकार घ्यावा. मंडळांनी केलेल्या सूचनांचीही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पोलीस आतापासूनच लोकजागृतीचे काम करणार आहेत. गणेशोत्सवाचा पुरेपूर वापर हा गणेशोत्सव मंडळांनी स्वत:हून विधायक कार्यासाठी पुढे येऊन करायचा आहे. त्यासाठी कोणावरही सक्ती केली जाणार नसल्याचे पोलीस अधीक्षक मोहिते यांनी स्पष्ट केले. यावेळी गणेशोत्सवातील पोलीस बंदोबस्त, गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवरही चर्चा करण्यात आली.
या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सोहेल शर्मा, जिल्ह्णातील सर्व पोलीस उपअधीक्षक, सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षक, आदी उपस्थित होते.


श्रावणषष्ठी यात्रेसाठी परजिल्ह्यांतून बंदोबस्त
जुलै महिनाअखेरीस जोतिबा डोंगरावरील श्रावणषष्ठी यात्रा होत आहे. या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने भाविक जोतिबा डोंगरावर येतात. या यात्रेच्या पोलीस बंदोबस्ताबाबतही नियोजनावर चर्चा करण्यात आली. बंदोबस्तासह वाहनांचे पार्किंग, भाविकांच्या सुविधा, आदी नियोजनाबाबत चर्चा झाली. या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्णातील पोलीस बंदोबस्त अपुरा पडणार असल्याने परजिल्ह्णांतून बंदोबस्तासाठी पोलीस घेण्यात येणार आहेत.
निर्भया पथकाचे काम गतिमान करणार
कोल्हापूर जिल्ह्णातील निर्भया पथकाच्या कामांचे कौतुक झाले आहे; पण आता महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या निर्भया पथकांचे काम आणखी गतिमान करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
अवैध धंदे
१०० टक्के बंद करणार
कोल्हापूर जिल्ह्णातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यावर या आढावा बैठकीत चर्चा झाली. या अवैध धंद्यांची पाळेमुळे उपटून काढण्यासाठी आगामी गणेशोत्सवात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय मोटार वाहन अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करणे, आदी विषयांवरही चर्चा करण्यात आली.

Web Title: Do not be forced, do Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.