वीस टक्के अनुदानावर समाधानी राहू नका : तात्यासाहेब मस्कर
By admin | Published: April 30, 2017 06:58 PM2017-04-30T18:58:50+5:302017-04-30T18:58:50+5:30
राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे कृतज्ञता सोहळा
आॅनलाईन/लोकमत
कोल्हापूर, दि. ३0 : वीस टक्के अनुदानावर मी समाधानी नाही. तुम्ही देखील राहू नका. पूर्ण अनुदान मिळविण्यासाठीच्या लढ्यासाठी एकी कायम ठेवा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब मस्कर यांनी रविवारी येथे केले.
येथील मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवनमध्ये समितीतर्फे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील होते. कायम विनअनुदानित शाळा कृती समितीच्या १७ वर्षांच्या लढ्यात २० टक्के अनुदान मिळवून देण्यासाठी सहकार्य केलेल्या मान्यवरांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.
अध्यक्ष मस्कर म्हणाले, विविध स्वरुपातील आंदोलनाच्या माध्यमातून अविरतपणे लढा दिल्याने २० टक्के अनुदान मिळविण्यात आपल्याला यश आले. शिक्षणमंत्र्यांनी वाढीव अनुदान देण्याचा शब् द दिला आहे. मात्र, सध्याच्या २० टक्के अनुदानाबाबत मी समाधानी नाही. समितीतील शिक्षक, कार्यकर्त्यांनी देखील यावर समाधानी राहू नये. शंभर टक्के अनुदान मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. पूर्ण अनुदान मिळविण्यासाठी समितीतर्फे यापुढेही लढा द्यावा लागणार आहे. यासाठी संघटनेतील एकी कायम ठेवा, त्याच्यावर जोरावर यश मिळत राहील.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील म्हणाले, वीस टक्के अनुदानाबाबतचे यश सहजासहजी मिळालेले नाही. यात अनेकांचे योगदान आहे. पूर्ण अनुदानासाठीच्या कायदेशीर लढ्याला समिती, शिक्षकांनी तयार रहावे. त्यासाठी शैक्षणिक व्यासपीठांच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल.
या कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष मस्कर यांचा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांना बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांतर्फे ‘बुलेट’ प्रदान करण्यात आली. तिची चावी जगदाळे यांच्याकडे संतराम मुंडे,विकास टेकाळे यांनी प्रदान केली. यानंतर दादा लाड यांची भाषणे झाली.
यावेळी कोल्हापूर वेतन पथकाचे अधीक्षक शंकरराव मोरे, लेखाधिकारी वैभव राऊत, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व्ही. जी. पोवार,मुख्याध्यापक संघ विनाअनुदान समितीचे अध्यक्ष एस. एम. पाटील, विनअनुदानित शाळा कृती समितीचे प्रकाश पाटील, सुनिल कल्याणी, गजानन काटकर, शिवाजी खापणे, जनार्दन दिंडे, जयंत आसगांवकर, एस. डी. लाड, भरत रसाळे, एस. एन. मस्कर, राजेश वरक, के. के. पाटील, आदी उपस्थित होते. मच्छिंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले. राजू मोरे यांनी सूत्रसंचालन केले. राम कदम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)