तत्त्वांशी तडजोड करू नका, कष्ट करा: तुकाराम मुंढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 11:21 PM2019-03-03T23:21:02+5:302019-03-03T23:21:06+5:30
कोल्हापूर : कौटुंंबिक, सामाजिक परिस्थितीचा बाऊ करू नका. आपण काय काम करू शकतो, हे लक्षात घेऊन कार्यरत राहा. आपल्या ...
कोल्हापूर : कौटुंंबिक, सामाजिक परिस्थितीचा बाऊ करू नका. आपण काय काम करू शकतो, हे लक्षात घेऊन कार्यरत राहा. आपल्या तत्त्वांशी कधी तडजोड करू नका. कष्टाची तयारी ठेवा, असे आवाहन आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी रविवारी येथे तरुणाईला केले.
कोल्हापूर येथील केआयटी महाविद्यालयाच्या ‘वॉक विथ वर्ल्ड’तर्फे आयोजित ‘अभिग्यान २०१९’मध्ये सामाजिक, प्रशासकीय, आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींसमवेत संवाद साधला.
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे, ‘पूर्णब्रह्म’ ही महाराष्ट्रीय फूड चेन सुरू करणाऱ्या जयंती कठाळे, इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे सल्लागार प्रभाकर देवधर, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, खासगी वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी साधलेल्या संवादामुळे तरुणाई भारावून गेली. या कार्यक्रमात मुंढे म्हणाले, स्पर्धा परीक्षेसाठी रोज आठ ते दहा तासांचा अभ्यास पुरेसा आहे; पण चोवीस तास त्यातील यशाबाबतचा विचार मनात असायला हवा. प्रशासकीय सेवेत यायचे असल्यास परीक्षार्थी व्हा. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ती परीक्षा कशासाठी घेतली जाते, त्याचा अभ्यास करा. शासकीय सेवेतील पदावर गेल्यानंतर माणसाला माणूस म्हणून न्याय द्यायचा आहे, फक्त एवढा विचार करून कार्यरत रहा. समाजासाठी चांगल्या गोष्टी करा; म्हणजे तुम्हाला इतरांपुढे झुकावे लागणार नाही. जयंती कठाळे म्हणाल्या, स्वप्नांचा वेध घ्या, त्यांना मर्यादा घालू नका. तुम्ही कसे दिसता आणि कसे राहता याचा तुमच्या कामावर काही परिणाम होऊ देऊ नका. आपली रेषा मोठी करा. दुसऱ्याची लहान करण्यात तुमचे कष्ट वाया घालवू नका. वेळेची आणि माणसांची वाट पाहू नका. ज्या क्षेत्रात काम करायचे आहे, ते आजच सुरू करा. प्रभाकर देवधर म्हणाले, केवळ पैसा मिळविण्यासाठी नव्हे, तर नवीन काही शोधण्यासाठी शिक्षण घ्या. त्यातूनच तुमची नवी आणि वेगळी ओळख निर्माण होणार आहे.
राष्ट्रबांधणीची भूमिका, सर्वांवर प्रेम
मुलाखतीतील जलद प्रश्नांची उत्तरे मुंढे यांनी दिली. पंतप्रधान झाला तर काय भूमिका असणार या प्रश्नावर त्यांनी राष्ट्रबांधणीची भूमिका राहणार असे उत्तर दिले. कोणतीही गोष्ट प्रेमानेच करतो. तणाव, अडचण आल्यावर पत्नीशी संवाद साधतो. चित्रपटाचे नायक म्हणून व्हिलन सोडून कोणतीही भूमिका करेन. माणूस ओळखणे ही सर्वांत अवघड गोष्ट, अशी उत्तरे त्यांनी दिली.