हरकतीवरती सुनावणी झाल्याशिवाय मोजणी करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:52 AM2021-09-02T04:52:20+5:302021-09-02T04:52:20+5:30
शिये : भुये-भुयेवाडी येथे प्रस्तावित नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग मोजणीस सोमवारी झालेला विरोध डावलून शिये येथे पुन्हा ...
शिये : भुये-भुयेवाडी येथे प्रस्तावित नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग मोजणीस सोमवारी झालेला विरोध डावलून शिये येथे पुन्हा मोजणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या हरकतीवरती सुनावणी न देता पोलीस बळाचा वापर करून मोजणी करत असाल तर, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिला. नरके यांनी मोजणीचे काम पुन्हा बंद पाडले. या वेळी महामार्गाच्या रेखांकनांचे काम रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामासाठी शिये ते केर्ले या भागातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या रस्त्यांमुळे परिसरातील मोठ्या प्रमाणावर उपजावू शेती बाधित होणार असल्याने अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या रेखांकनास विरोध आहे. पैसे पाच पटीने मिळाले तरी ते राहणार नाही. शिये ते परडवाडी येथील सुमारे चारशे लोकांच्या जीवनाचे निगडित हा प्रश्न असल्याने पालकमंत्री, खासदार व संबंधित अधिकारी यांच्या बरोबर मीटिंग लावावी, अशी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या हरकती वरती सुनावणी होत नाही, तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना शेतामध्ये फिरू देणार नसल्याचे नरके यांनी सांगितले. या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णात पवार, माणिक शिंदे, उत्तम पाटील, मानसिंग पाटील, दीपक पाटील, सुनील पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.