डच्चू नाही..राजीनामा दिला
By Admin | Published: May 19, 2016 12:08 AM2016-05-19T00:08:37+5:302016-05-19T00:41:57+5:30
शेतकरी संघातील राजकारण : मानसिंगराव जाधव यांचे म्हणणे; मनमानीस चाप लावल्याचा म्होरक्यांना राग
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचा कारभार काटकसरीने केला असून, संघाचे नुकसान होईल असे एकही कृत्य कार्यकारी संचालक म्हणून केलेले नाही; परंतु काही ‘म्होरक्यां’च्या मनमानीस चाप लावल्यानेच त्यांना मी या पदावर नको होतो, म्हणून विरोध सुरू झाल्यामुळे त्यांनी मला काढून टाकण्याऐवजी मी स्वत:हूनच राजीनामा दिला असल्याची माहिती संघाचे संचालक मानसिंगराव जाधव यांनी दिली.
मंगळवार (दि. १७)च्या अंकात ‘लोकमत’मध्ये संघाच्या कार्यकारी संचालक पदावरून डच्चू देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याबद्दलची वस्तुस्थिती स्वत: जाधव यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयात येऊन दिली.
ते म्हणाले, ‘मी गेली नऊ वर्षे संघाचा संचालक आहे. माजी अध्यक्ष वसंतराव मोहिते यांच्यासमवेत काम करीत असताना सातत्याने संघाच्या हिताचाच विचार केला. त्यामुळेच आम्ही सात टक्क्यांवरून ११ टक्क्यांपर्यंत लाभांश देऊ शकलो. कार्यकारी संचालक म्हणून गेल्या नऊ महिन्यांत केलेल्या कामामुळे संस्थेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. या काळातील सेवेचा मी एक पैसाही मोबदला घेतलेला नाही. संघाचे वाहन उपलब्ध होते; परंतु त्याचा वापर मी फक्त कार्यालयात येण्या-जाण्यासाठीच केला. इतरवेळी मी स्वत:चे वाहन वापरत असे. संघाच्या सभासदांना माझ्या कामाबद्दल विश्वास होता म्हणूनच मी गेल्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी झालो. माझे हात स्वच्छ आहेत आणि कोणीही माझ्याकडे बोट दाखवू शकेल, असा एकही व्यवहार माझ्याकडून झालेला नाही.’
संघाच्या मासिक बैठकीत जेव्हा माझ्याकडे राजीनामा मागण्यात आला तेव्हा तो मी तातडीने दिला आहे. कार्यकारी संचालक पदावरून दूर झालो तरी संघाचा संचालक म्हणून मी संस्थेत राहणार आहेच; त्यामुळे खरी लढाई आता सुरू झाली आहे, असे जाधव यांनी सांगितले.
कार्यकारी संचालक पदावर मी असल्याने काहींच्या हितसंंबंधांना बाधा येऊ लागली होती. कुंभी-कासारी कारखान्यावरील संघाच्या गोदामाच्या दुरुस्तीचे काम करायचे होते. रीतसर इस्टिमेट मागवून ते करावे, असे सुचविले होते; परंतु दोन लाख १० हजार रुपयांचे हे काम एकच कोटेशन घेऊन आम्ही सांगतो त्या व्यक्तीस द्यावे, असा आग्रह काहींनी केला. तो मी मान्य केला नाही.
संघाच्या पुनाळ शाखेत सुमारे एक लाख ७५ हजारांचा गैरव्यवहार झाला आहे. बिद्री शाखेत सुमारे सात लाखांचा गैरव्यवहार झाला आहे. पुनाळ शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. बिद्री शाखेतील गैरव्यवहाराची रक्कम संबंधित व्यवस्थापकांकडून भरून घेऊन मगच चौकशी सुरू करावी, असे संचालक मंडळाच्या बैठकीतच ठरले होते. परंतु, या दोन्ही शाखांच्या व्यवस्थापकांच्या वेतनवाढी रोखून त्यांना कामावर घ्यावे, असा आग्रह होता. त्यास मी विरोध केला. ज्यांनी गैरव्यवहार केला आहे, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, असे माझे म्हणणे होते.