कामगारविरोधी कायदे राज्यात लागू करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:25 AM2021-01-03T04:25:43+5:302021-01-03T04:25:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या कामगार व शेतकरीविरोधी कायद्याला पायबंद घालण्यासाठी विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन महाविकास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या कामगार व शेतकरीविरोधी कायद्याला पायबंद घालण्यासाठी विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन महाविकास आघाडी सरकारने बोलवावे व हे कायदेच महाराष्ट्रात लागू करु नयेत यासाठी ‘महाराष्ट्र इंटक’तर्फे लवकरच मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती ‘इंटक’चे अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
छाजेड म्हणाले, केंद्राने कायदा केल्यामुळे राज्यातील अनेक उद्योग-व्यवसाय मालकांनी कामगारांना तडकाफडकी काढून टाकले. याची राज्य कामगार मंत्रालयाने गंभीर नोंद घेणे गरजेचे होते. कामगारांमध्ये केंद्राने केलेल्या कायद्याची प्रचंड दहशत आहे. काॅर्पोरेट घराण्यांच्या सोईसाठी केलेला कायदा महाराष्ट्रात लागू होणार नाही, असे राज्य शासनाने जाहीर करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने किमान समान कार्यक्रमात राज्यातील श्रमजिवी वर्ग व कामगारांच्या प्रश्नांचाही उल्लेख करावा. यासह अन्य मागण्यांचा विचार करून हा मोर्चा मंत्रालयावर काढला जाणार आहे. तो राज्य सरकारविरोधी नसून केंद्र सरकारच्या विरोधासाठी काढला जाणार असल्याचेही छाजेड यांनी स्पष्ट केले.
मोर्चाची तारीख लवकरच ठरवली जाईल. सर्वांत मोठी कामगार संघटना असूनही कामगारविषयक शासकीय समित्यांमध्ये ‘इंटक’ला डावलले जात आहे, असा स्पष्ट आरोप अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत केला आहे. ही बाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांना कळविण्यात आली आहे. माथाडी कामगार बोर्डाची फेररचना करावी. त्यात प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी केली होती, असे छाजेड यांनी सांगितले. यावेळी हिंदुराव पाटील-वाकरेकर, शामराव कुलकर्णी, अप्पा साळोखे, सुरेश सूर्यवंशी, आनंदा दोपारे, मुकेश तिगोटे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.