डॉल्बी लावणाºयांची हयगय नाही : चंद्रकांतदादा पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 02:11 PM2017-08-26T14:11:28+5:302017-08-26T14:27:19+5:30
कोल्हापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीसांना कारवाई करावीच लागणार आहे. डॉल्बी लावणाºयांची कोणत्याही परिस्थितीत हयगय करणार नसून पोलीस कठोर भूमिका बजावतील, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला.
शेतकरी तंबाखू संघाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शुक्रवारी गणेश आगमनावेळी राजारामपुरी येथे घडलेल्या प्रकाराने दु:ख झाल्याचेही सांगितले. समाज एकत्र यावा, त्यातून प्रबोधन व्हावे यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. गणेशोत्सवासारख्या आनंदाच्या क्षणी गाणी कोणती लावावीत, वाद्ये कोणती वाजवावीत हा मंडळांचा प्रश्न आहे. पण त्यामुळे समाजाला त्रास व धोका होईल, असे करणे चुकीचे आहे.
गणेशोत्सवाला शंभर वर्षे पुर्ण झाल्याने नाना पाटेकर यांच्या सारख्या ज्येष्ठ अभिनेत्यांच्या माध्यमातून प्रबोधन सुरू आहे. तरीही असे प्रकार घडत असतील तर काय बोलावे.
आगामी दहा दिवस गणेशोत्सवासह विसर्जन मिरवणूकही शांततेत पार पाडावी. मिरवणूक व वाद्यांबाबत पोलीस शनिवारी सगळ्या मंडळांना परिपत्रक काढणार आहेत. तरीही डॉल्बी लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर प्रशासन हयगय करणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
डॉल्बी बाबतची कलमे पाहिली तर त्यामध्ये अनेक तरूणांची आयुष्य बरबाद होतील, पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे. त्यामुळे मंडळांनी कायदा समजावून घेऊन शांततेत गणेशोत्सव पार पाडावा, असे आवाहन करत जे कायदा पाळणार नाहीत त्यांच्याबाबतीत कठोर भूमिका घ्यावीच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
हरियाणातील घटनेने धक्का
हरियाणा व पंजाब मध्ये राम रहीम सिंग यांच्या शिक्षेवरून घडलेला हिसांचाराची घटना निश्चितच धक्कादायक आहे. महाराष्टÑातही त्यांचे काही अनुयायी असल्याने असा प्रकार होऊ नये, यासाठी सरकार सज्ज असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.