आदर्श गाव निवडीचा पालकमंत्र्यांनाच विसर
By admin | Published: January 8, 2016 12:41 AM2016-01-08T00:41:22+5:302016-01-08T01:26:17+5:30
आमदार आदर्श ग्राम योजना : मुख्यमंत्र्यांचा संकल्प; तरीही आमदारांचा प्रतिसाद तोकडा; विकासाची पाटी कोरीच
भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील आमदार आदर्श ग्राम योजनेतून गावांची निवड करण्याचा विसर चक्क पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील यांना पडला आहे. त्यामुळे या योजनेला आमदारांचाच प्रतिसाद तोकडा पडत आहे. जिल्ह्यातील उर्वरित सर्व आमदारांनी आपल्या मतदारसंघातील गावांची निवड केली आहे. योजनेची अंमलबजावणी सुरू होऊन चार महिने झाले तरी अद्याप निवडलेल्या गावातील ‘विकासाची पाटी’ कोरीच आहे.
महात्मा गांधी यांना अपेक्षित असलेले आदर्श गाव साकारण्यासाठी सांसद आदर्श ग्राम योजना केंद्र शासनाने सुरू केली. या योजनेतून प्रत्येक खासदारांनी एक गाव दत्तक घेतले. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना २० मे २०१५ रोजी सुरु केली. त्यानंतर शासनाच्या ग्रामविकास विभागाने योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक सूचनांचा आदेश ८ आॅक्टोबर काढण्यात आला. लोकांचा सहभाग, स्त्री, पुरुष समानता, महिलांना सन्मानाची वागणूक, आर्थिक व सामाजिक न्याय, श्रमाची प्रतिष्ठा, स्वच्छतेची संस्कृती, पर्यावरण संतुलन, नैतिक मूल्यांचे पालन, नैसर्गिक मूल्यांचे जतन, आदी कामे योजनेतून करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे निवडलेल्या गावांचा लोकसहभागातून अन्य गावांसमोर आदर्श ठेवण्यासाठी सर्वांगीण विकास करणे हा मुख्य उद्देश आहे.
योजनेतून प्रत्येक विधानसभा आणि विधान परिषद आमदाराने तीन गावांची निवड करावयाची आहे. एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींची या योजनेत निवड करणे आवश्यक आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचना येऊनही अजून गाव निवड न झाल्याने उदासीनता दिसून येत आहे. आपण निवडलेल्या गावासह सर्व आमदारांच्या दत्तक गावात विकासाची कामे झाली आहेत की नाही, याचा आढावा घेण्याची जबाबदारी म्हणून पालकमंत्री पाटील यांची आहे. मात्र, त्यांनीच अद्याप तीन गावे निवडलेली नसल्याचे पुढे आले आहे. त्यांच्यासह आमदार नरके, आमदार सत्यजित पाटील यांनीही गावे निवडीकडे लक्ष दिलेले नाही. गावांची निवडच न झाल्याने पहिल्या टप्प्यातही योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. नूतन विधान परिषद आमदार सतेज पाटील यांनाही आता या योजनेसाठी गावे निवडावी लागणार आहेत. अन्य आमदारांनी निवडलेल्या गावांत ग्रामसभा, महिलासभा, बालसभा, शिबिर, पदयात्रा या माध्यमातून जागृती केली जात आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे ग्रामविकास आराखडा तयार होऊनही प्रत्यक्ष विकासकामांना अद्याप प्रारंभ झालेला नाही.
जिल्ह्यातील आमदारांनी निवडलेली गावे...
आमदारांनी निवडलेली गावे व कंसात मतदारसंघ असे : उल्हास पाटील (शिरोळ)- निमशिरगाव, घालवाड, बुबनाळ (ता. शिरोळ), सुरेश हाळवणकर (इचलकरंजी)- चंदूर, खोतवाडी, तारदाळ (ता. हातकणगंले), डॉ. सुजित मिणचेकर -किणी, लक्ष्मीवाडी, माणगाव (ता. हातकणंगले), रमेश लटके (अंधेरी पूर्व)- येळवण जुगाई (ता. शाहूवाडी), संध्यादेवी कुपेकर (चंदगड)- तेरणी (ता. गडहिंग्लज), कुरणी (ता. चंदगड), हत्तीवडे (ता. आजरा), अमल महाडिक (कोल्हापूर दक्षिण)-मुडशिंगी, दिंडनेर्ली, कणेरी (ता. करवीर), हसन मुश्रीफ (कागल)- मडिलगे (ता. आजरा), प्रकाश आबिटकर (राधानगरी-भुदरगड-आजरा)- धामोड (ता. राधानगरी), राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर)- मौजे तासगाव (ता. हातकणंगले). काही आमदारांनी पहिल्या टप्प्यातील एक, तर काहींनी २०१९ पर्यंतची तीन गावे निवडलेली आहेत.
तीन गावे २०१९ पर्यंत आदर्श
टप्प्याटप्प्याने निवडलेली तीन गावे सन २०१९ पर्यंत आदर्श ग्राम म्हणून विकसित करावयाची आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सर्व शासकीय विभागाने मदत करणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पातळीवर विकासकामे प्रभावीपणे राबविण्यास शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत.
गावांची निवड करण्याचे राहिले आहे. निवडीसंबंधी प्राथमिक चर्चा झाली आहे. अंतिम निवड करून जिल्हाधिकाऱ्यांकडे यादी दिली जाईल.
- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री