चुकीच्या पद्धतीने घरफाळा नको
By admin | Published: March 11, 2017 12:05 AM2017-03-11T00:05:34+5:302017-03-11T00:05:34+5:30
कृती समितीची मागणी : घरफाळा वाढीला विरोध; महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासन शहरातील मिळकतधारकांवर चुकीच्या पद्धतीने घरफाळा आकारत असून सन २०११ पासून वसूल केलेल्या वीस टक्के जादा घरफाळ्याची रक्कम मिळकतधारकांना परत करावी आणि यापुढे चुकीच्या पद्धतीने घरफाळा आकारला जाऊ नये, अशी मागणी येथील सर्वपक्षीय घरफाळा वाढ विरोधी कृती समितीने आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली.
कृती समितीच्या शिष्टमंडळाने आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शिष्टमंडळात अॅड. बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, बाबा पार्टे, प्रसाद जाधव, सुरेश गायकवाड, जयकुमार शिंदे, जहिदा मुजावर, वैशाली महाडिक, सविता पाटील, वंदना जाधव, शोभा खेडकर, सुनीता राऊत, कविता कोंडेकर, गायत्री राऊत, रुपाली पाटील आदींचा समावेश होता.
यावेळी झालेल्या चर्चेत बाबा इंदूलकर यांनी महापालिका ज्या पद्धतीने घरफाळा आकारते ती पद्धत चुकीची असल्याचा दावा केला. इमारतीचे किंवा जमिनीचे भांडवली मूल्य निश्चित करण्याकरीता जमिनीचे किंवा इमारतीचे चटई क्षेत्र हा घटक आयुक्तांनी विचारात घेण्याचा आहे; परंतु सन २०११-१२ पासून महासभेच्या मान्यतेनुसार घरफाळा हा भांडवली मूल्यावर आधारीत वसूल करण्याचे धोरण ठरविले. महानगरपालिकेने या कामासाठी नियमावली तयार केली असली तरी त्यास शासनाकडून मान्यता घेतलेली नाही तशी मान्यता घेणे अनिवार्य होते. शासनाच्या आदेशाला हरताळ फासून इमारतीचे भांडवली मूल्य ठरविण्यासाठी चटई क्षेत्र विचारात न घेता बांधीव क्षेत्र विचारात घेतले. त्यामुळे घरफाळ्याची आकारणी वीस टक्क्याने जादा झाल्याचा दावा इंदूलकर यांनी केला. महापालिकाने २०११-१२ पासून आतापर्यंत चुकीचा घरफाळा वसूल केल्याने त्याची रक्कम जवळपास तीस कोटी होत असून ती परत करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)
पद्धत योग्यच - कारंडे
ज्या शहरात रेडिरेकनर निश्चित करण्यात आलेला नाही, त्या शहरात चटई क्षेत्राचा विचार करावा, असा नियम आहे. मात्र, कोल्हापूर शहरात रेडिरेकनरचे दर निश्चित झाले असल्याने महानगरपालिकेने स्वीकारलेली घरफाळ्याची पद्धत योग्य असल्याचे घरफाळा विभागाचे प्रमुख दिवाकर कारंडे यांनी यावेळी सांगितले. तर आयुक्त शिवशंकर यांनी तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे कायदेशीरदृष्ट्या तपासून घेतले जातील, असे सांगितले.