मानधनवाढ न दिल्याने अंगणवाडी सेविकांचा जेलभरो-तब्बल अर्धातास रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 06:34 PM2019-02-11T18:34:54+5:302019-02-11T18:35:59+5:30
अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसाठी केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०१८ ला अधिसूचना काढली आहे; त्यामुळे महाराष्टÑातील अंगणवाडी सेविकांना सुमारे १२ हजार मानधन मिळणार आहे; परंतु त्याची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे
कोल्हापूर : अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसाठी केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०१८ ला अधिसूचना काढली आहे; त्यामुळे महाराष्टÑातील अंगणवाडी सेविकांना सुमारे १२ हजार मानधन मिळणार आहे; परंतु त्याची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून तब्बल अर्धा तास रास्ता रोको करून जेलभरो आंदोलन केले.
पोलिसांनी तीनशेहून अधिक महिलांना ताब्यात घेऊन सुटका केली. ताब्यात घेताना दोघांमध्ये झटापटही झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.दुपारी १२ च्या सुमारास महावीर उद्यान येथून कॉ. आप्पा पाटील व जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखालील अंगणवाडी सेविकांनी धडक मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर रास्ता रोको करून ठिय्या मारण्यात आला. या ठिकाणी आंदोलकांनी मुख्यमंत्री व महिला बालविकास मंत्र्यांसह सरकारविरोधात धिक्काराच्या घोषणा देत तीव्र निदर्शने करून परिसर दणाणून सोडला.
आप्पा पाटील म्हणाले, सरकारने मानधनवाढीची अधिसूचना काढूनही त्याची अंमलबजावणी न केल्याने जेलभरो आंदोलन केले जात आहे. अंगणवाडी सेविकांच्या सेवासमाप्ती लाभामध्ये तिपटीने वाढ करावी. ३० एप्रिल २०१४ नंतर सेवा संपलेल्या अंगणवाडी सेविकांची आजपर्यंत न दिलेली लाभाची रक्कम त्वरित द्यावी. मानधनाच्या अर्धी रक्कम पेन्शन म्हणून देण्यात यावी. अंबे्रला योजनेतील सुधारित दर लागू करावेत. विमा योजनांची अंमलबजावणी करावी. पाच व १0 वर्षांच्या वाढीव मानधनाची फरकासह रक्कम द्यावी, अशा विविध मागण्यांकडेही शासनाने दुर्लक्ष केले आहे; त्यामुळे सरकारविरोधातील उद्रेक या आंदोलनातून व्यक्त केला जात आहे.
तब्बल अर्धातास सुरू असलेल्या रास्ता रोकोमुळे वाहतुकीची कोंडी झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये नेत असताना झटापटही झाली. तीनशेहून अधिक अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन व्हॅनमधून कनाननगर परिसरातील तावडे लॉन येथे नेऊन सोडले. आंदोलनात शोभा भंडारे, सुनंदा कुºहाडे, मंगल माळी, पुष्पा वाळके, सुरेखा कोरे, विद्या कांबळे, रेखा कांबळे, आदींसह अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.
मानधनवाढीसह इतर मागण्या मान्य न केल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल अर्धा तास रास्तारोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री यांच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शनेही केली. (छाया : नसीर अत्तार)
अंगणवाडी आंदोलन ०२/०३/०४/०५
फोटोओळी : मानधनवाढीसह इतर मागण्या मान्य न केल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल अर्धा तास रास्तारोको करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना ताब्यात घेताना (छाया : नसीर अत्तार)