हुंडा देणार नाही, घेणारही नाही, लमाण समाजाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 02:40 PM2019-02-16T14:40:58+5:302019-02-16T14:43:18+5:30
कोल्हापूर : सेवालाल महाराजांच्या नावाने शपथ घेऊन पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात लमाण समाजाने शुक्रवारी समाजातील बेगड्या प्रथा, परंपरांना ...
कोल्हापूर : सेवालाल महाराजांच्या नावाने शपथ घेऊन पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात लमाण समाजाने शुक्रवारी समाजातील बेगड्या प्रथा, परंपरांना मूठमाती देण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. हुंडा देण्याघेण्यावर निर्बंध घालतानाच अंत्यविधीवेळी होणाऱ्या अनावश्यक खर्चाच्या बाबतीतही नवा विचार स्वीकारण्याची समाजाने सामूहिक शपथ घेतली.
लमाण समाज विकास संघाच्या नेतृत्वाखाली शाहू स्मारक भवनमध्ये लमाण समाजाचा मेळावा झाला. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील समाजबांधव मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र पवार यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच भरविण्यात आलेल्या या मेळाव्यात सुरेश पवार, वसंतराव मुळीक, अशोक लाखे, विमल राठोड, संजू राठोड, राजू चव्हाण, अविनाश सरनाईक, पुंडलिक चव्हाण, संतोष राठोड, अशी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
लमाण समाज भटक्या विमुक्तात मोडतो. या समाजात पारंपरिक प्रथा मोठ्या प्रमाणावर आहेत. या समाजाचे संत असलेले सेवालाल हे पुरोगामी विचारांचे होते. समाजाला अडचणीत घालणाºया प्रथा, परंपरांना त्यांचा विरोध होता. ते स्वत: शाकाहारी होते; पण समाज एकसंघ राहावा म्हणून परंपरांना टोकाचा विरोध केला नाही. परिणामी याचा वेगळा अर्थ काढून समाजात हुंड्यासारख्या अनिष्ठ प्रथेने पाय घट्ट केले.
साखरपुड्याला ताटात पाच लाख रुपये, त्यानंतर गाडी व उर्वरित १५ लाखांपर्यंतचा हुंडा वधुपित्याकडून घेतल्याशिवाय वर बोहल्यावर चढत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हुंडा देणे समाजातील सर्वसामान्यांना परवडत नाही. तरीही समाजाच्या विरोधात जायचे नाही म्हणून हुंडा देणे-घेणे सुरूच आहे. शिवाय मयताच्या वेळी लाख दीडलाख रुपये सहज खर्च होतात. मांसाहारी पंगती उठतात. यातून समाजातील गोरगरिबांना न झेपणारा खर्च करावा लागतो. प्रसंगी कर्ज काढावे लागते.
या प्रथांच्या विरोधात समाजातच आता आवाज उठू लागला आहे. मेळाव्यात सेवालाल महाराजांच्या नावाने शपथ घेत, या प्रथा पाळणार नसल्याचे समाजाने हात उंचावून जाहीर केले. याचे पालन न करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यासह महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचाही निर्णय झाला.
२५ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
भटक्या विमुक्त जाती जमातीला झोपडपट्टी योजना लागू करणे. आदिवासींप्रमाणे लमाण समाजाला हक्काने जमीन मिळणे, विधवांना संजय गांधी निराधार पेन्शन चालू करणे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मिळणे, वसंतराव नाईक तांडा वस्तीसाठी ७0 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सोडविणे, आदी मागण्यांसाठी समाजाने लढ्याची घोषणा केली. २४ पर्यंत निर्णय न झाल्यास २५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरूकरण्याचा निर्णय मेळाव्यात झाला.