पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊ नका
By admin | Published: May 3, 2015 12:59 AM2015-05-03T00:59:25+5:302015-05-03T00:59:25+5:30
संभाजी ब्रिगेड : कार्यक्रम उधळून लावू
कोल्हापूर : ज्यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली व जेम्स लेनच्या पुस्तकाचे प्रचारक म्हणून ज्यांनी काम केले, अशा बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करणे म्हणजे महापाप आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देऊ नये, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्याकडे शनिवारी करण्यात आली.
पुरंदरे यांनी वेगवेगळ्या पुस्तकांतून मराठा-बहुजन स्त्रियांची बदनामी केली. अशा विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन तो बाटविण्याचेच काम सरकारकडून होत आहे. आमच्या पूर्वजांच्या रक्तातून हा महाराष्ट्र घडला आहे आणि इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्याला आम्ही कदापि ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊ देणार नाही. तसेच पुरंदरे यांच्या विकृत लिखाणाविरोधात कोल्हापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल आहे. तसेच हा पुरस्कार फक्त ब्राह्मणांसाठीच आहे का? या प्रश्नाचे उत्तर द्यावे. आजपर्यंतचे १५ पुरस्कार ब्राह्मणांना व एकच पुरस्कार कुणबी समाजातील डॉ. विजय भटकर यांना देण्यात आला आहे.
पुरंदरे यांना हा पुरस्कार देऊन सरकार एकप्रकारे शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचेच काम करीत आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे की, शिवभक्तांच्या व मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून पुरंदरेंना हा पुरस्कार देऊ नये. तरीही हा पुरस्कार देण्याचा घाट घातल्यास हा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शिष्टमंडळात कार्याध्यक्ष रूपेश पाटील, संघटक जितेंद्र पाडेकर, संदीप पाटील, भगवान कोईगडे, शिवाजी गुरव, दत्ता मेटील, अनिकेत सावंत, सागर गवळी, संदीप बोरगावकर, दीपक दळवी, विनोद यादव, गिरीश कदम, योगेश जगदाळे, धनाजी मोरबाळे, अजय बोभाटे, विकास जाधव, विजयकुमार पाटील, संजय यादव, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)