ब्रेस्ट कॅन्सरकडे दुर्लक्ष नको : रेश्मा पवार
By Admin | Published: March 23, 2015 11:55 PM2015-03-23T23:55:25+5:302015-03-24T00:15:40+5:30
स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा (भाभी) यांचा द्वितीय स्मृतिदिन
कोल्हापूर : तरुण महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत खूपच वाढले आहे. वेळीच निदान झाल्यास तो बरा होतो. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये, असा कानमंत्र डॉ. रेश्मा पवार यांनी दिला. लोकमत ‘सखी मंच’च्या संस्थापिका आणि लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा (भाभी) यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ‘सखी मंच’तर्फे सोमवारी ‘ओंजळ फुलांची’ या कार्यक्रमाचे आयोजन शाहू स्मारक भवनात केले होते. यावेळी ‘लढा ब्रेस्ट कॅन्सरशी’ या विषयावर डॉ. पवार बोलत होत्या. डॉ. पवार म्हणाल्या, लहान वयात मासिक पाळी होणे, दीर्घकाळाने होणारी अपत्ये, वय, अनुवंशिकता, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन यामुळे स्तनाचा कर्करोग होतो; पण अनुवंशिकतेमुळे स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त आहे. कर्करोगाची लक्षणे दिसताच महिलांनी उपचार घ्यावेत. यावर शस्त्रक्रिया हा सर्वोत्तम उपचार आहे.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे, उपचारपद्धती, मॅमोग्राफी, गर्भायशाचा कर्करोग व त्याची कारणे व उपचार या विषयीही डॉ. पवार यांनी माहिती दिली. दुसऱ्या सत्रात मधुबन निर्मित व घन:श्याम वेंगुर्लेकर प्रस्तुत ‘भजन संध्या’ या कार्यक्रमात घन:श्याम वेंगुर्लेकर, रणजित बुगले, विजय कुलकर्णी, वैदही जाधव यांनी भजने सादर केली. यावेळी ‘ओंकार स्वरूपा...’, ‘उठी-उठी गोपाळा...’, ‘देह देवाचे मंदिर...’ आदी गीतरचना वेंगुर्लेकर आणि सहकलाकारांनी सादर केल्या. वर्षा गाडगीळ यांनी निवेदक म्हणून काम पाहिले.
डॉ. रेश्मा पवार आणि घन:श्याम वेंगुर्लेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि स्वर्गीय ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. संयोजिका प्रिया दंडगे यांनी संयोजन केले. (प्रतिनिधी)