पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी फोन बंद ठेवू नयेत : कोल्हापूरात आयुक्तांच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 10:55 AM2019-03-06T10:55:29+5:302019-03-06T10:57:22+5:30
कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असून या विभागातील सर्व संबंधित अधिकारी व शाखा अभियंता यांनी आपले फोन बंद ठेवायचे नाहीत, अशा सक्त सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या.
कोल्हापूर : शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असून या विभागातील सर्व संबंधित अधिकारी व शाखा अभियंता यांनी आपले फोन बंद ठेवायचे नाहीत, अशा सक्त सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या.
कोल्हापूर शहरअंतर्गत होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत आयुक्त कलशेट्टी यांनी जल अभियंता सुरेश कुलकर्णी व शाखा अभियंता यांच्यासमवेत स्थायी समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना काळम्मावाडी पाणी योजना पूर्ण होईपर्यंत शहरातील सर्व प्रभागांत सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे लागणार आहे.
सध्या ई वॉर्डमधील काही प्रभागांचा पाणीप्रश्न गंभीर असून, त्या ठिकाणी पाणीपुरवठा कशा पद्धतीने सुरळीत करता येईल, याबाबत संबंधित शाखा अभियंता यांनी त्यावर मार्ग काढावा, असे आयुक्त म्हणाले.
नगरसेवक व नागरिकांना नम्रपणे पाणी पुरवठ्याची वस्तुस्थिती समजावून सांगा. ज्या भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, त्याचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी शाखा अभियंता रामनाथ गायकवाड, भास्कर कुंभार, यू. जे. भेटेकर, आर. के. पाटील, राजेंद्र हुजरे, अक्षय आटकर, गुंजन भारंबे, अभिलाषा दळवी, राजेंद्र पाटील, मिलिंद पाटील, आदी उपस्थित होते.