आधारकार्डची मतदार ओळखपत्राशी ‘लिंक’ लागेना
By admin | Published: May 19, 2015 07:22 PM2015-05-19T19:22:13+5:302015-05-20T00:13:05+5:30
शिबिराला अल्प प्रतिसाद : लिंकिंगसाठी आॅनलाईन किंवा पुढील शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन
इचलकरंजी : मतदान ओळखपत्राला आधारकार्ड जोडणी (लिंकिंग) करण्यासाठी रविवारी झालेल्या शिबिरात हातकणंगले, इचलकरंजी व शिरोळ परिसरातील २१ हजार जणांनी जोडणी केली. जोडणीला मिळणारा प्रतिसाद अल्प प्रमाणात असून, २१ जून व १२ जुलैला होणाऱ्या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी जोडणी करून घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी पत्रकार बैठकीत केले.पहिल्यांदा घेण्यात आलेले शिबिर व आॅनलाईन पद्धतीने झालेल्या जोडण्या यामध्ये हातकणंगले २७८-विधानसभा मतदारसंघातील तीन लाख चार हजार ८८६ मतदारांपैकी ७,२१९ जणांनी जोडणी केली होती.
रविवारी झालेल्या शिबिरात ७,३९५ नागरिकांनी जोडणी केली. त्यामुळे आता १४,६०० नागरिकांची जोडणी पूर्ण झाली आहे. इचलकरंजी २७९ - विधानसभा मतदारसंघातील दोन लाख ७१ हजार ७७ मतदारांपैकी ४,९२२ नागरिकांनी जोडणी केली होती.
रविवारच्या शिबिरात १,९३३ जणांनी जोडणी केली. एकूण ६,८५५ नागरिकांची जोडणी झाली आहे. तर शिरोळ २८०-विधानसभा मतदारसंघातील दोन लाख ९१ हजार ८४ मतदारांपैकी १८,१६६ नागरिकांनी जोडणी केली होती. रविवारच्या शिबिरात ११,७३० जणांनी जोडणी केली. त्यामुळे एकूण २९,८९६ नागरिकांनी जोडणी केली आहे.
जोडणीसाठी मिळणारा हा प्रतिसाद अल्प असून, येणाऱ्या शिबिरात अथवा आॅनलाईन पद्धतीने लवकरात लवकर जोडणी करून मतदारांनी आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी केले. यावेळी हातकणंगलेचे तहसीलदार दीपक शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)
यादी अपडेट होणार...
मतदान ओळखपत्र व आधारकार्ड यांची जोडणी केल्यानंतर डबल झालेले मतदान ओळखपत्र रद्द होतील. तसेच मतदारांची यादी अपडेट होईल. यामुळे मतदान प्रक्रियेतही सुलभता येईल, या हेतूने शासनामार्फत जोडणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.