विकासकामांत टक्केवारी पाहू नका
By admin | Published: April 3, 2016 03:50 AM2016-04-03T03:50:13+5:302016-04-03T03:50:13+5:30
विजय शिवतारे : नृसिंहवाडीत कन्यागत महापर्व काळाच्या विकासकामांना प्रारंभ
नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाळासाठी होणारी विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक होण्यासाठी प्रशासन आणि ठेकेदार यांनी योग्य खबरदारी घ्यावी, यात टक्केवारी पाहू नये, असा मार्मिक सल्ला राज्याचे जलसंधारण व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी नृसिंहवाडी येथे दिला.
नृसिंहवाडीसह पंचक्रोशीतील गावांच्या विकासासाठी १२१ कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शासनाचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार उल्हास पाटील, जि. प.च्या अध्यक्षा विमल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शक्ती आणि भक्तीने नटलेला कोल्हापूर जिल्हा आणि या जिल्ह्याचे ऊर्जास्रोत असेलेले श्री क्षेत्र नृसिंहवाडी, सातशे वर्षांची धार्मिक परंपरा, श्रद्धेची अनेकांना आलेली प्रचिती यांचा विचार करून बारा वर्षांनी येणाऱ्या कन्यागतसाठी हा भरघोस निधी राज्य शासनाने दिला आहे. नाशिक येथील कुंभमेळ्याच्या धर्तीवर येथील नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे हा सोहळा सर्वांच्या सहकार्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडणार आहे.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आमचे शासन हे छत्रपती शिवाजी व शाहू यांच्या विचाराप्रमाणे रयतेचे शासन आहे. त्यांच्या काळात रयतेला कोणत्याही प्रश्नासाठी आंदोलन करावे लागत नव्हते; कारण जनतेचे प्रश्न राजांना माहीत होते. त्याचप्रमाणे आमचे शासन काम करीत आहे. कन्यागतसाठी आम्ही भरघोस निधी दिला, हे आमचे कर्तव्य आहे. तुम्ही शासनाचा सत्कार केला, या तुमच्या भावना मुख्यमंत्रीसाहेबांपर्यंत निश्चित पोहोचवू.
यावेळी आमदार उल्हास पाटील यांनी भरघोस निधीबद्दल मुख्यमंत्री व शासनाचे विशेष आभार मानले. सरपंच अरुंधती जगदाळे यांनी स्वागत केले. उपसरपंच धनाजीराव जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. या समारंभास जि. प.च्या बांधकाम सभापती सीमा पाटील, पं. स. शिरोळच्या सभापती सुवर्णा अपराज, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष वैभव उगळे, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.