गडकोटांकडे पर्यटनस्थळ म्हणून बघू नका
By admin | Published: March 24, 2015 12:04 AM2015-03-24T00:04:41+5:302015-03-24T00:12:33+5:30
निनाद बेडेकरांचा गौरव : मिलिंद तानवडे यांचे आवाहन
सांगली : छत्रपती शिवाजी महाराजांचा चालता-बोलता इतिहास म्हणजे त्यांनी निर्माण केलेले गडकोट आहेत. त्याकडे केवळ पर्यटनस्थळ म्हणून बघू नका, तर त्यांच्यापासून प्रेरणा घ्या, असे आवाहन मिलिंद तानवडे यांनी आज, सोमवारी केले.
सांगली नगरवाचनालयातर्फे ‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सन्माना’ने इतिहाससंशोधक निनाद बेडेकर यांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी ‘गडकोटांच्या अनुभूती’ या विषयावर ते बोलत होते. मिलिंद तानवडे म्हणाले, विविध गडमोहिमा केल्यामुळे शिवरायांच्या गडकोटांविषयी खूप काही शिकायला मिळाले. प्रत्येक गड म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आहे. गडांकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात बदल होणे गरजेचे आहे. कित्येकजण सुट्टीच्या कालावधित गडांवर केवळ पर्यटनस्थळ म्हणून जातात. तेथून निघताना देशाचे काही आधारस्तंभ गडांच्या बुरुजांवर, भिंतीवर स्वत:ची नावे लिहितात व गडांच्या सौंदर्याला बाधा आणतात. वास्तविक शिवरायांनी एकाही गडावर स्वत:चे नाव लिहिलेले नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. गडावर जाण्याआधी तेथे जो प्रेरणादायी इतिहास घडला आहे, त्याचे वाचन प्रामुख्याने तरुण पिढीने केले पाहिजे. गड वाचनाची गोडी लागली, तर त्यासारखे दुसरे सुख नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास संभाजीराव भिडे, जगदीश देवधर, अतुल गिजरे, श्रीकांत जोशी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान
अंदमान हे देशातील क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान आहे. परंतु तेथे असणाऱ्या विविध बेटांना आजही ब्रिटिशांचीच नावे आहेत. ती नावे वाचली की दु:ख होते. वास्तविक सेल्युलर जेलमधील क्रांतिवीरांची नावे तेथील बेटांना द्यायला हवीत, अशी अपेक्षा निनाद बेडेकर यांनी व्यक्त केली.