अवैध व्यावसायिकांची गय करू नका
By admin | Published: February 19, 2017 12:44 AM2017-02-19T00:44:54+5:302017-02-19T00:44:54+5:30
महादेव तांबडे : पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत कठोर कारवाईसाठी सूचना
कोल्हापूर : जिल्ह्णात छुप्या मार्गाने अवैध धंदे करणाऱ्यांना ठोकून काढा. पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकही अवैध धंदा सुरू नसला पाहिजे. गावगुंडापासून छोट्या-मोठ्या टोळ्या असोत किंवा गँगवॉर; कोणाचीही गय केली जाणार नाही. जिल्ह्णात शांतता राखण्यासाठी कारवाईचे कठोर धोरण अवलंबा, अशा सूचना पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक तांबडे यांनी जिल्ह्णातील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक पोलिस मुख्यालयात शनिवारी घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या कामकाजासह विभागीय पोलिस उपअधीक्षकांचा आढावा घेतला. जिल्ह्णात मटका, जुगार, दारू आदी अवैध धंद्यांचे प्रमाण वाढत आहे. छुप्या मार्गाने अवैध धंदे करणाऱ्यांना ठोकून काढा. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळेल, त्या ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना त्याचा खुलासा द्यावा लागेल, असे सांगितले.
‘भाई’,‘बापू’, ‘अण्णा’, ‘मामा’ अशा टोपणनावाच्या फाळकूटदादांची यादी तयार करा. गुन्हेगारी नेस्तनाबूत करण्यासाठी कठोर पाऊल उचला, अशा सूचना तांबडे यांनी केल्या.
उपअधीक्षकांनी लक्ष द्यावे
जिल्ह्यात दोन अप्पर पोलिस अधीक्षक व सहा. पोलिस उपअधीक्षक आहेत. प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये पाच ते सहा पोलिस ठाणे आहेत. या पोलिस ठाण्यांच्या कामकाजावर तुमचे नियंत्रण पाहिजे. तुम्ही लक्ष ठेवून राहिला तर पोलिस निरीक्षक असो वा कॉन्स्टेबल त्याचे अवैध व्यावसायिकांशी सलगी वाढविण्याचे धाडस होणार नाही. प्रत्येक पोलिस ठाण्याचे कामकाज पारदर्शक होण्यासाठी पोलिस उपअधीक्षकाने जबाबदारीने आपल्या कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्याचा रोजचा आढावा घेतला पाहिजे, अशा सूचना तांबडे यांनी केल्या.
दारू, पैशाची तस्करी रोखा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत दारू, पैशाची उलाढाल मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सलग पाच दिवस जिल्ह्यात नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करा. रात्रगस्तीमध्ये वाढ करा. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी प्रत्येकाने रात्रीचा दिवस करा, अशा सूचना तांबडे यांनी पोलिस निरीक्षकांना केल्या.