राजकीय अडचणी वाढवू नका
By Admin | Published: September 21, 2014 01:13 AM2014-09-21T01:13:58+5:302014-09-21T01:24:39+5:30
‘दक्षिण’चे राजकारण : पी. एन. पाटील यांचा महादेवराव महाडिक यांना सल्ला
कोल्हापूर : तुम्ही काँग्रेसचे आमदार आहात. मुलगा काँग्रेसचाच जिल्हा परिषदेचा सदस्य आहे. तोंडावर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघासह (गोकुळ) राजाराम कारखान्याची निवडणूक आहे. वर्षभरात विधान परिषदेचीही निवडणूक आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून अमल महाडिक यांच्यासाठी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपची उमेदवारी घेतल्यास ते अडचणीचे ठरेल, त्यामुळे राजकीय अडचणी वाढवू नका, असा सल्ला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील यांनी आज, शनिवारी आमदार महादेवराव महाडिक यांना दिला.
महाडिक यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, एकमेकांच्या राजकीय अडचणी वाढवू नयेत, असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना सांगण्यात येईल व त्यांची जबाबदारी आम्ही पक्षातील प्रमुख नेतेमंडळी घ्यायला तयार आहोत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) ताराबाई पार्कातील कार्यालयात या दोघाच नेत्यांची सकाळी साडेदहाच्या सुमारास बंद खोलीत तासभर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीवेळी आमदार महाडिक यांनी पी. एन. यांची दोनवेळा भेट घेऊन पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्याला प्रतिसाद देऊन पाटील यांनी धनंजय महाडिक यांना करवीर मतदारसंघातून निर्णायक मताधिक्य दिले. आता स्वत:ही पी. एन. पाटील हे करवीर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तेव्हा त्यासाठी सहकार्य, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या घडामोडी व कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील महाडिक गटाची भूमिका या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
पी. एन. यांनी जिल्ह्यातील संभाव्य राजकीय स्थितीचा आलेख मांडला. महाडिक यांचा मुलगा अमल हा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. तसे झाल्यास आमदार महाडिक व काँग्रेससमोरीलही अडचणी वाढू शकतात, हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. चुका दुरुस्त करून काँग्रेस म्हणून एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जाऊया, असे पी. एन. यांनी महाडिक यांना सूचविले. त्यांनी त्याला प्रतिसाद देत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या राजकारणाबद्दल त्यांनी तक्रार केली. त्यावर पी. एन. यांनी सतेज पाटील यांच्याशी बोलणे झाले असून, काहीतरी तोडगा काढूया; पण काँग्रेसमध्येच एकमेकांशी भांडत बसण्याची ही वेळ नाही, असे स्पष्ट केले.