पुनर्वसन केल्याशिवाय झोपड्या हटवू नका

By Admin | Published: June 11, 2015 10:49 PM2015-06-11T22:49:30+5:302015-06-12T00:43:36+5:30

फासेपारधी कुटुंबीयांचे आंदोलन : इचलकरंजी नगरपालिकेसमोरच पेटविल्या चुली

Do not remove the huts without rehabilitation | पुनर्वसन केल्याशिवाय झोपड्या हटवू नका

पुनर्वसन केल्याशिवाय झोपड्या हटवू नका

googlenewsNext

इचलकरंजी : झोपडपट्टी हटवून त्याठिकाणी बाजारकट्टा बांधण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींचा निषेध करत नगरपालिकेच्या प्रवेशद्वारातच चुली पेटवून तेथे वास्तव्यास असलेल्या फासेपारधी समाजातील कुटुंबीयांनी गुरूवारी आंदोलन केले. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांबरोबर त्यांची शाब्दिक चकमकही उडाली. अखेर नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी पुनर्वसन केल्याशिवाय झोपड्या हलविल्या जाणार नाहीत, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली.
येथील स्वामी मळा परिसरात पालिकेच्या मालकीची ३४ गुंठे जमीन आहे. तेथे १९८७-८८ सालापासून फासेपारधी समाजातील वीस कुटुंबे झोपड्या बांधून राहत होते. काही वर्षांपूर्वी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई करून नऊ झोपड्या हटविल्या. मात्र, तेथे अद्यापही अकराच झोपड्या आहेत. झोपड्या हटविताना समाजातील नागरिकांनी आंदोलन केले. त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी नितीन देसाई यांनी पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ठरावही करण्यात आला. मात्र, नगरपालिकेच्यावतीने अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
या जागेवर बाजार कट्ट्याचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे तेथे आमदार निधीतून बाजार कट्टा बांधण्यासाठी २३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूर झाल्यानंतर बाजार कट्टा बांधण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. त्यासाठी तेथील झोपडपट्ट्या हटविणे गरजेचे आहे. याची कुणकुण लागल्याने फासेपारधी कुटुंबीयांनी जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत नगरपालिकेसमोरच चूली पेटवू, असा इशारा दिला. त्याप्रमाणे गुरूवारी आदिवासी फासेपारधी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मोहन काळे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर असलेल्या जागेत कुटुंबीयांनी चुली पेटवून स्वयंपाक करण्यास सुरूवात केली. आंदोलनात महिला, मुले व वृद्ध या सर्वांनी भाग घेऊन ठिय्या मारला. त्याचबरोबर प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्याबरोबरही आंदोलकांची शाब्दिक चकमक उडाली.
नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, पाणीपुरवठा सभापती रवी रजपुते आणि अतिरिक्त मुख्याधिकारी
प्रज्ञा पोतदार यांनी आंदोलकांची
भेट घेतली. काळे यांनी समाजाच्या अडचणी मांडल्या. त्या ऐकून घेऊन नगराध्यक्षा बिरंजे यांनी या जागेवरील सर्वच कुटुंबांचे पुनर्वसन केल्याशिवाय झोपड्या हटविल्या जाणार नाहीत. प्रत्येकाला साईट नंबर १०२ मध्ये हक्काची जागा देण्यात येईल,
असे आश्वासन दिले. आश्वासनानंतर आंदोलकांनी तयार केलेले
जेवण तेथेच जेऊन आंदोलन
मागे घेतले. आंदोलनात शंकर चव्हाण, सावंता चव्हाण, सिकंदर काळे, गोपाळ काळे यांच्यासह समाजातील नागरिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Do not remove the huts without rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.