कोरेगाव भीमा घटनेची उजळणी नको -उत्तम कांबळे कागलमध्ये सामाजिक सलोखा परिषदेतील सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:38 AM2018-02-07T00:38:29+5:302018-02-07T00:41:49+5:30
कागल : कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना आणि त्यानंतर राज्यभर झालेला हिंसाचार हा अत्यंत दुर्दैवी प्रकार होता. पुरोगामी महाराष्ट्राला चुकून पडलेले ‘एक वाईट स्वप्न’ असा विचार करून त्या घटनांची पुन्हा
कागल : कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना आणि त्यानंतर राज्यभर झालेला हिंसाचार हा अत्यंत दुर्दैवी प्रकार होता. पुरोगामी महाराष्ट्राला चुकून पडलेले ‘एक वाईट स्वप्न’ असा विचार करून त्या घटनांची पुन्हा पुन्हा उजळणी करण्याचे टाळूया. छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीत अशा लाजिरवाण्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्वांनी दक्षता घेऊया, अशा भावना सर्वच वक्त्यांनी येथे झालेल्या ‘सामाजिक सलोखा परिषदेत’ व्यक्त केल्या.
येथील गैबी चौकात आरपीआय (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या परिषदेचे आयोजन केले होते. आमदार हसन मुश्रीफ, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, डॉ. अच्युतराव माने, भन्ते एस. संबोधी, आर. आनंद, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आर. पी. आय.चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शहाजी कांबळे होते.
यावेळी आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, अठरापगड जाती, धर्म, विविध भाषा, संस्कृतींचा आपला देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या अठरापगड जातींना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. शाहू-फुले-आंबेडकरांनीही हाच विचार सांगितला. या विचारांमुळेच सामाजिक सलोखा नांदेल. प्रा. संजय मंडलिक म्हणाले, राजर्षी शाहूंच्या कोल्हापूरनगरीत जातीयतेला कधी थारा मिळालेला नाही.
कागल तालुक्यात कै. सदाशिव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांनी पुरोगामित्वाचा वारसा जोपासला. कोल्हापुरात आम्ही भारतीय चळवळ लोक आंदोलन पुन्हा सुरू करूया. संजयबाबा घाटगे म्हणाले, पेशवाई नष्ट करण्याचे काम दलित योद्ध्यांनी केले. छ. शिवरायांनी दलितांना शस्त्र हाती घेण्याचा अधिकार दिला होता. हा इतिहास नाकारून चालणार नाही.
कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ सर्व बहुजनांची अस्मिता आहे.समरजितसिंह घाटगे म्हणाले, जो इतिहास घडला आहे तो आपण बदलू शकत नाही. मात्र, इतिहासापासून शिकले पाहिजे. एका कोरेगाव भीमा घटनेनंतर आमच्यात फूट पडावी, एवढे दुबळे संस्कार आमच्यावर झाले आहेत का? इतिहासात झालेल्या चुका वर्तमानात दुरुस्त करूया.
बी. आर. कांबळे यांनी स्वागत, तर बाबासाहेब कागलकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. अच्युतराव माने, प्रा. शहाजी कांबळे, डॉ. अनिल माने, विश्वास देशमुख, मंगलराव माळगे, दगडू भास्कर, सखाराम कामत, बळवंतराव माने, सुभाष देसाई, चंद्रशेखर कोरे, सत्कारमूर्ती उत्तम कांबळे यांचीही भाषणे झाली.
साडेतीन तास चालली परिषद
सायंकाळी सात वाजता सुरू झालेली ही परिषद साडेदहाला संपली. व्यासपीठाला कै. पांडुरंग सोनुले, भीमराव मोहिते या कार्यकर्त्यांचे नाव दिले होते. उत्तम कांबळे यांचा तसेच त्यांच्या आई-वडिलांचाही सत्कार करण्यात आला. कै. सदाशिवराव मंडलिक, कै. विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तालुक्यातील प्रमुख नेते एकत्र आल्याने कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी झाली होती.
संजय घाटगेंनी मांडला इतिहास
या परिषदेत सर्वांत प्रभावी भाषण करीत संजय घाटगे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या, इंग्रज-पेशवे युद्ध, दलित योद्ध्यांची कामगिरी, असा ओघवता इतिहास मांडला. औरंगजेब आणि पेशव्यांच्या फर्मानाला घाबरून कोणीही पुढे आला नाही; पण दलित समाजातील लोक पुढे आले आणि त्यांनी आमच्या छत्रपतींवर महारवाड्यात अत्यसंस्कार केले. हे मान्य करायला लाज कसली वाटते? असा सवाल करताच घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कागल येथे झालेल्या सामाजिक सलोखा परिषदेत उत्तम कांबळे यांचा बुद्धमूर्ती देऊन भन्ते एस. संबोधी, आर. आनंद यांनी सत्कार केला. यावेळी बी. आर. कांबळे, शहाजी कांबळे, समरजित घाटगे, संजय घाटगे, डॉ. अच्युत माने उपस्थित होते.