वस्तू खरेदीनंतर पिशवीसाठी पैसे घेऊ नका: ग्राहक पंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 04:22 PM2019-05-06T16:22:15+5:302019-05-06T16:26:31+5:30
मॉल व बझारमधून वस्तूच्या खरेदीनंतर त्या भरून दिल्या जाणाऱ्या पिशवीकरिता ग्राहकांकडून पाच रुपयांपासून १२ रुपये आकारले जात आहेत. तसेच या पिशवीवर आपल्याच मॉलची केली जात असलेली जाहिरात योग्य नाही. त्यामुळे वस्तू खरेदीनंतर ग्राहकांकडून पैसे घेऊ नका, असे लेखी पत्र शनिवारी (दि. ४) अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव यांनी बिग बझार, स्टार बझार, रिलायन्स मॉलच्या व्यवस्थापनाला दिले.
कोल्हापूर : मॉल व बझारमधून वस्तूच्या खरेदीनंतर त्या भरून दिल्या जाणाऱ्या पिशवीकरिता ग्राहकांकडून पाच रुपयांपासून १२ रुपये आकारले जात आहेत. तसेच या पिशवीवर आपल्याच मॉलची केली जात असलेली जाहिरात योग्य नाही. त्यामुळे वस्तू खरेदीनंतर ग्राहकांकडून पैसे घेऊ नका, असे लेखी पत्र शनिवारी (दि. ४) अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष अरुण यादव यांनी बिग बझार, स्टार बझार, रिलायन्स मॉलच्या व्यवस्थापनाला दिले.
वस्तू खरेदीनंतर मॉल व बझार व्यवस्थापनाकडून पिशवीसाठी स्वतंत्रपणे पैसे आकारले जातात. या संदर्भात ग्राहक पंचायतकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. याबाबत २९ एप्रिलला ‘लोकमत’मध्ये ‘मॉलमध्ये खरेदीनंतर पिशवी मोफतच द्यावी’ अशा आशयाचे वृत्त देऊन या विषयाला वाचा फोडण्यात आली होती.
त्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष अरुण यादव हे पदाधिकाऱ्यांसह शनिवारी (दि. ४) उद्यमनगर येथील बिग बझार, जुन्या पुणे-बंगलोर मार्गावरील उड्डाणपुलाशेजारील स्टार बझार, लक्ष्मीपुरी येथील रिलायन्स मॉल येथे जाऊन व्यवस्थापनाला भेटले. या ठिकाणी ग्राहकांना पिशवीसाठी पैसे आकारू नयेत, असे लेखी पत्र संबंधितांना सादर केले.
चंदीगढ ग्राहक न्याय मंचने ‘बाटा’ कंपनीस नऊ हजार रुपये दंड केला आहे; कारण त्यांनी ग्राहकांकडून पिशवीचे तीन रुपये घेतले होते. तरी इथून पुढे पिशवीची विक्री केल्यास आपल्याविरोधात चंदीगड ग्राहक तक्रार निवारण मंचच्या केसच्या आधारावर कोल्हापूर ग्राहक तक्रार निवारण मंचकडे दाद मागितली जाईल, असा इशाराही या पत्राद्वारे देण्यात आला.
यावेळी जिल्हा संघटक जगन्नाथ जोशी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक बंडगर, कोषाध्यक्ष शिवनाथ बियाणी, सचिव अनिल जाधव, अॅड. ज्योत्स्ना ढासाळकर, विठोबा चव्हाण, राजू मोरे, अर्जुन पाटील, विश्वनाथ पोतदार, सागर पोवार, दयानंद सुतार, आदी उपस्थित होते.