ऊस तोडणीच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांनी बोलू नये
By admin | Published: September 30, 2016 12:29 AM2016-09-30T00:29:27+5:302016-09-30T01:36:15+5:30
महाडिक यांचा पलटवार : शासनाने वीज घेण्याची तयारी दाखविली तरच ‘सहवीज’
कोल्हापूर : सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत असताना काही मंडळींना ती ऐकायची नव्हती. सत्ता असताना ऊसतोडणी टोळीचे पैसे भागविण्यासाठी जायचे आणि त्यावर डल्ला मारायचा, अशा मंडळींनी पारदर्शक कारभारावर बोलू नये, असा पलटवार महादेवराव महाडिक यांनी विश्वास नेजदार यांच्यावर केला.
कारखान्याच्या सभेनंतर महाडिक पत्रकारांशी बोलत होते. नेजदार हे दहा वर्षे उपाध्यक्ष होते, त्यावेळी ऊसतोडणी टोळीचे पैसे देण्यासाठी ते स्वत: जात होते. टोळीने पैसे बुडविले म्हणून सांगायचे आणि त्यातील निम्या पैशांवर स्वत:च डल्ला मारत होते. ‘एफआरपी’साठी सर्वच कारखान्यांनी कर्जे घेतली, आम्ही ८० लाख ४१ हजारांचे घेतले पण आमच्याकडे १२९ कोटींची साखर शिल्लक आहे. शासनाने वीज घेण्यास मान्यता दिल्यानंतरच सहवीज प्रकल्प करणार असल्याचे सांगत ऊस वाढावा यासाठीच ‘संरक्षित कुळा’ला सभासद करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे महाडिक यांनी सांगितले. दुष्काळासाठी दहा लाख,आयुक्त कार्यालय बांधकामासाठी सव्वा दोन लाख असे पैसे गेल्याने व्यवस्थापन खर्च वाढल्याचे दिसते. आगामी हंगामासाठी कसबा बावड्यातील ऊस वाहतुकीसाठी शंभर बैलगाड्या जादा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार अमल महाडिक, माजी महापौर शिवाजीराव कदम, सत्यजित कदम, पी. जी. मेढे उपस्थित होते.