चर्चा नको, अॅक्शन घ्या, चंद्रकांत जाधव : वाहतूकीची कोंडी फोडण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 04:14 PM2019-12-12T16:14:33+5:302019-12-12T16:17:32+5:30
शहरात वाहतूकीचा बट्याबोळ उडाला आहे. त्यामुळे आता नुसतीच चर्चा नको तर अॅक्शन घ्यावी, असे आदेश गुरुवारी आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिले. वाहतूकीची कोंडी एकाच वेळी फोडणे शक्य नाही. त्यामुळे एक परिसर निश्चित करुन सर्व यंत्रणा वापरुन येथील वाहतूकीला शिस्त लावा. राजारामपुरी येथून याची सुरवात करण्याची सूचनाही त्यांनी केली. शहरातील वाहतूकीच्या समस्या संदर्भात महापालिका आणि शहर वाहतूक शाखा यांची महापालिकेत संयुक्त बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
कोल्हापूर : शहरात वाहतूकीचा बट्याबोळ उडाला आहे. त्यामुळे आता नुसतीच चर्चा नको तर अॅक्शन घ्यावी, असे आदेश गुरुवारी आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिले. वाहतूकीची कोंडी एकाच वेळी फोडणे शक्य नाही. त्यामुळे एक परिसर निश्चित करुन सर्व यंत्रणा वापरुन येथील वाहतूकीला शिस्त लावा. राजारामपुरी येथून याची सुरवात करण्याची सूचनाही त्यांनी केली. शहरातील वाहतूकीच्या समस्या संदर्भात महापालिका आणि शहर वाहतूक शाखा यांची महापालिकेत संयुक्त बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
आमदार चंद्रकांत जाधव यांनी रस्त्यावर पट्ट्या मारणे, फायबरचे दुभाजक लावणे, गाड्या पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. नो पार्कींग, पार्किंग झोन करावा, गरजेच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. अतिक्रमण हटवावीत, अशा सूचना केल्या. सीपीआर प्रशासनाने इमारतीमध्ये वाहने बंदी केली आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने लावली जात आहे. याबाबत आमदार जाधव यांनी बैठकीमध्येच सीपीआरचे अधिकाऱ्यांना फोन करुन रुग्णांच्या नातेवाईकांची वाहने रुग्णालयाच्या आतच लावण्याची सूचना केली.
नातेवाईकांना कूपन द्यावीत. कुपन असणाऱ्यांना आत प्रवेश द्यावा, अशा सूचनाही केल्या. वाहतूक सल्लागार विनायक रेवणकर यांनी किमान पुढील वीस वर्षे वाहतुकीची समस्या उदभवणार नाही, याबाबत नियोजन करावे. अस मत मांडले. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेटट्टी, नगरसेवक अर्जुन माने, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, हर्षजीत घाटगे, केएमटीचे अधिकारी उपस्थित होते.
खासगी बसच्या पार्कींगचे नियोजन करा
शहरातील मध्यवर्ती बसस्थानक या परिसरात वडाप आणि खासगी बसच्या बेशिस्त पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. खासगी वाहतूक करणाºया बसची मालकांशी बैठक घेण्यात यावी. यामध्ये त्यांच्या बसची संख्या किती आहे. त्यांची सुटण्याच्या वेळाचा चार्ट तयार करावा. त्यांची सुटण्याच्यावेळीच व्यतरिक्त त्यांना शहराच्या मुख्य मार्गावर थांबवू देऊ नये, अशा सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली.
खासगी बस कावळ्या नाक्या बाहेर पार्कींग
माजी नगरसेवक राजेश लाटकर यांनी खासगी बसमुळे मध्यवर्ती बस स्थानक येथे वाहूकीची कोंडी होत असल्याचे सांगितले. यावर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी खासगी बस कावळ्या नाक्याच्या बाहेरच पार्कींग करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
बाहेरुन येणारी वाहने शहरातून नको
शहरातील वाहतूक कोंडी कमी झाली पाहिजे. त्यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल. क्रीडाईने शहरातील रिंग रोडच्या संदर्भात आराखडा तयार केला आहे. त्यानुसार त्यातील काही रस्ते जोडले नाहीत. खानविलकर पेट्रोल पंप ते शिवाजी पूल हा रस्ता अद्याप जोडलेला नाही. असे रस्ते जोडले तर बाहेरून येणारे वाहने शहरात न येता बाहेरुनच जातील.
फेरीवाल्याला रोज दोन हजाराचे भाडे
महापालिका कोणतेही ठोस भूमीका घेत नाही. नुसते सर्व्हे सुरु असल्याचे कारण पुढे करत आहे. गेल्या तीन वर्षापासून झोन निश्चित करण्याचे काम सुरु आहे. दुकानाच्या दारात बसण्यासाठी दोन हजाराचे भाडे दिले जात असल्याचे समोर येत असल्याचे राजेश लाटकर यांनी निदर्शनास आणले. सभापती देशमुख यांनी महापालिकेने ३ हजार फेरीवाल्याना बायोमेट्रीक कार्ड दिल्याची नोंद आहे. तर प्रत्यक्षात दहा हजार बायोमेट्रीक कार्ड असणारे फेरीवाले असल्याचे सांगितले. विनायक रेवणकर यांनी फेरीवल्या नेत्यांचीच ८ ते १0 हातगाड्या असल्याचे स्पष्ट केले.