माझ्या पार्थिवाला हातही लावू नका, जवानाचा राजकारण्यांना संदेश
By Admin | Published: March 13, 2017 08:47 PM2017-03-13T20:47:34+5:302017-03-13T21:16:56+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका जवानाने राजकारणी आणि भ्रष्ट शासकीय अधिका-यांना आपल्यापासून दूर राहण्याचा फलक गावात उभारला
>संदिप आडनाईक / ऑनलाइन लोकमत
चंदगड, दि. 13 - कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एका जवानाने राजकारणी आणि भ्रष्ट शासकीय अधिका-यांना आपल्यापासून दूर राहण्याचा फलक गावात उभारला आहे, तसेच यासंदर्भात एक व्हिडिओही प्रसिध्द केला आहे. भारतीय सैन्यातील तेजबहाद्दूर सिंह याच्या पाठोपाठ आता या जवानानेही सरकारविरोधात उघड भूमिका घेतली आहे.
जर मी देशाचं रक्षण करत असताना शहीद झालो, तर नितीमत्ता, भ्रष्ट झालेल्या नेत्यांनी आणि लाचखोर सरकारी अधिकाºयांनी माझ्या पार्थिव देहाला हात लावू नये, ही माझी अंतिम इच्छा आहे, असे या जवानाने म्हटलेले आहे.
चंदगड तालुक्यातील म्हाळुंगे या गावचे जवान लान्स नायक रणजीत गावडे यांनी गावात हा भव्य फलक लावलेला आहे. दिवसेंदिवस भारतीय सैनिकांबद्दल अपशब्द वापरले जा असल्याने गावडे यांनी हा फलक लावलेला आहे. त्यांनी उभारलेल्या या फलकात म्हटले आहे, की मी सैनिकी सेवा बजावत असताना मला वीरमरण आल्यास नितीमत्ता भ्रष्ट झालेल्या नेत्यांनी आणि लाचखोर सरकारी अधिकाºयांनी माझ्या पार्थिव देहाला हात लावू नये. ही माझी शेवटची इच्छा असेल, सन्मानाने जगण्यासाठी आणि या भुंकणाºया कुत्र्यांना आवर घालण्यासाठी मावळ्यांनो संघटित व्हा, स्वाभिमानी सैनिक, लान्स हवालदार रणजित गावडे, म्हाळुंगे ता. चंदगड असा मजकूर या फलकावर लिहिलेला आहे.
फलकावरील मजकूर...
त्यावेळीपण मीच होतो, आतापण मीच आहे,
कधी सर्वांर्धाने, तर कधी स्वार्थाने लढलो आम्ही,
लढत आहोत, आणि लढतच राहू,
यातना कर्णाच्या सोसत राहू.
तोरणाचे तोरण, रायरेश्वरीची शपथ आम्हीच घेउ,
वार झेलू छातीवरती
कधी तानाजी बनून तर कधी बाजी
देश रक्षणार्थ उचलल विडा, त्यासाठी सांडवू रक्ताचा सडा
दाही दिशा गरजल्या होत्या अश्वटापू
जय भवानी, जय शिवाजी आम्ही गरजतच राहू
तुफान, सुसाट उडवून दिली आम्ही शाही,
कापून आणला शिरपेच, जलप्रतिबिंब नजरेस घेवू काफिराच्या,
तरीपण शल्यविशल्य जडतच राहिल,
पाणीपतची हार आम्हाला घोंगावतच राहिल
कोरड्या आमच्या जखमांना लालमाती हुंगतच राहिल.
राजे, या राजी उरलेत आता चोर
देश विका, धर्म विका, विका म्हणतात गोत,
आदिलाशही, मोगलशाही संपली आता राजेशाही
येथे आता जन्माला येतात रोजच नवे पुढारी,
मग कोणी आम्हाला बलात्कारी म्हणतोच,
तर कोणी आमची अब्रू वेशीला टांगतोच
कोणी सांगतोय आम्ही मरण्यासाठीच असतोय,
तर कोणी आमची अक्कल काढतोय,
मग का लढावे, प्रश्न पडतो, प्रश्न घेवूनच आम्ही जगतोय,
पुन्हा पुन्हा तेच म्हणतोय, त्यावेळीपण मीच होता, आतापण मीच आहे
कधी सर्वांर्थाने तर कधी स्वार्थाने लढलो आम्ही,
लढत आहोत आणि लढतच राहू,
असेल शेवटी काहीतरी, लढणारा तो मीच सैनिक आहे राजे