स्वत:ला मराठा समाजाचे ‘तारणहार’ समजू नका!
By admin | Published: September 10, 2016 12:52 AM2016-09-10T00:52:49+5:302016-09-10T00:53:07+5:30
संदीप मोझर : उदयनराजे यांचे नाव न घेता टीका; आंदोलनात पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय नेत्याने ‘पोपटपंची’ करू नये
सातारा : ‘मराठे हे कोण्या एका घराण्याचे किंवा विशिष्ट नेत्यांचे अनुयायी नाहीत. त्यामुळे केवळ ‘व्होट बँके’चा विचार करून या आंदोलनात आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय नेत्यांनी करू नये. प्रश्न मार्गी लागावा या ध्यासातून महामोर्चाकडे पाहावे. केवळ इव्हेंट आला की त्या प्रश्नात नाक खुपसून आम्हीच तारणहार असल्याचा आव आणणाऱ्यांनी समाजाची डोळेझाक व दिशाभूलचे माध्यम म्हणून मराठा आरक्षणाकडे पाहू नये. श्रेयवादासाठी काहींकडून पोपटपंची होत आहे,’ अशी खरमरीत टीका ‘मनसे’चे संदीप मोझर यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता केली.
याबाबत मनसेचे मोझर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून निघणाऱ्या सर्वच मोर्चांमध्ये अग्रक्रमाने सहभागी होणार असल्याबरोबरच मुंबईपासून बेळगावपर्यंत स्वत: नेतृत्व करून या प्रश्नी जनजागृती करणार आहे. तसेच हा प्रश्न धसास लागेपर्यंत प्रत्येक आंदोलनात माझ्यासह ‘स्वराज्य’चे मावळे आणि ‘मनसेसैनिक’ ही प्राणपणे लढा देतील.
मराठा समाजाला आजवर बहुसंख्य असूनही नेहमीच विविध ठिकाणी डावलण्यात आल्याची असंख्य उदाहरणे आहेत. बुद्धीमत्ता असूनही आर्थिक अडचणीमुळे बऱ्याचदा मराठा युवकांना योग्य ठिकाणी संधी मिळाल्याचे दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, समाजकारण, शिक्षण, सहकार, व्यवसाय, नोकरी आदी विविध क्षेत्रांमध्ये मराठा समाजास अग्रक्रमाने आणि अग्रहक्काने संधी मिळण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये लवकरच महामोर्चा काढण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणासाठी निघणाऱ्या या महामोर्चात माझ्या नेतृत्वाखाली स्वराज्य प्रतिष्ठानचे मावळे आणि मनसे सैनिक मोठ्या संख्येने सहभागी होतील. समाजातील महत्त्वाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी योगदान देतील.
मराठा आरक्षण महामोर्चावरून काही राजकीय संधीसाधू पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मात्र, त्याचा कांगावा जनतेच्या लक्षात येईल. त्यांना तांदळातील खड्यांप्रमाणेच दूर करतील. या आंदोलनाकडे आणि प्रश्नाकडे कोणीही संकुचितपणे पाहू नये, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली. या मोर्चात केवळ नेता म्हणून नव्हे तर मराठा म्हणून नेतेमंडळींनी सहभागी व्हायला हवे. समाजाच्या उन्नतीसाठी, जागृतीसाठी या मोर्चामध्ये यायला हवे. मी स्वत: हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठीच या महामोर्चात हजारो अनुयायी मावळे व कार्यकर्त्यांसमवेत सहभागी होत
आहे.या शिवाय बेळगावपासून ते मुंबई, देशभरात जिथे-जिथे मराठा आरक्षण प्रश्नांवर आंदोलन होतील तिथे सहभागी होऊ. अनेक ठिकाणी स्वत: नेतृत्व करून आंदोलन उभारू आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कणखरपणे लढा
देऊ, असेही मोझर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलेले आहे. (प्रतिनिधी)
अॅट्रॉसिटी कायद्याबाबत पाटील यांचे मत व्यक्तिगत
भाजप अनुसूचित जाती मोर्चाची भूमिका
कऱ्हाड : भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाला दिलेला जाहीर पाठिंबा व अॅट्रॉसिटी कायद्याचा फेरविचार व्हावा, असे व्यक्त केलेले मत हे त्यांचे व्यक्तिगत आहे. ती भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही, अशा आशयाचे प्रसिद्धीपत्रक भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने देण्यात आले
आहे. प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, व्यक्ती म्हणून प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाला भाजपचा पाठिंबा असल्याचे वक्तव्य एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. त्यांची ही भूमिका चुकीची असून, ती भाजपची भूमिकाच नाही. भाजपची भूमिका सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. वास्तविक मराठा समाजास आरक्षण मिळण्याबाबत शासनस्तरावर योग्य तो निर्णय होईलच. त्यामुळे अॅड. भरत पाटील यांचे मत हे व्यक्तिगत आहे, असे समजावे. या प्रसिद्धी पत्रकावर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण रवीढोणे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. विशाल शेजवळ, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी थोरात, अनुसूचित मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद देटके, कऱ्हाड तालुका उपाध्यक्ष अमोल थोरात आदींच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
उदयनराजेंच्या बदनामीविरोधात कऱ्हाडातही कार्यकर्त्यांचा उठाव
संताप व्यक्त : निवेदनाद्वारे मागणी
कऱ्हाड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांची काही विघ्नसंतुष्ट मंडळींनी फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट टाकली होती. राजेप्रेमी मंडळी
हे कदापी सहन करणार नाहीत. ही पोस्ट टाकणाऱ्या औरंगाबाद येथील दीपक केदार व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी कऱ्हाड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली
आहे.
शुक्रवार, दि. ९ सप्टेंबर २०१६ रोजी नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे यांच्याकडे किरण पाटील, उत्तम पाटील, सुनील आटुगडे, निवृत्ती पाटसुपे, राजेंद्र देसाई आदी कार्यकर्त्यांनी याबाबतचे निवेदन दिले. दोषींवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली. नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे यांनी आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, या निवेदनात म्हटले आहे की, खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा क्रांती मोर्चात
सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर त्यांनी आपली व्यक्तिगत काही मतेही नोंदवली
आहेत.
ती व्यक्त करण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. मात्र, काहींच्या ते पचनी न पडल्याने त्यांनी विचारांची लढाई विचाराने न करता उदयनराजे भोसले यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट फेसबुकवर टाकल्या. त्यामुळे छत्रपती घराण्याबद्दल आदर असणाऱ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला हे पचणारे नाही.
त्यामुळे शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ती भडकण्याअगोदर शासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या मोर्चात सहभाग घेण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांनी लोकभावनेचा आदर करून घेतला आहे. त्यासंदर्भात आपली मते मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. अशावेळी एका मोठ्या नेतृत्त्वावर टीका करणाऱ्यांची शासनाने गय करू नये.
- किरण पाटील, काले