‘श्रीमंतां’साठी शहराची वाट लावू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:07 AM2018-04-12T01:07:12+5:302018-04-12T01:07:12+5:30

Do not wait for the city to be 'rich' | ‘श्रीमंतां’साठी शहराची वाट लावू नका

‘श्रीमंतां’साठी शहराची वाट लावू नका

Next


कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने शहरातील गोरगरिबांची घरे ‘अतिक्रमणा’च्या नावाखाली उद्ध्वस्त केली, फेरीवाल्यांच्या गाड्या तोडल्या त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक यांना कळवळा का आला नाही, असा सवाल बुधवारी महानगरपालिकेतील काँग्रेस आघाडीतर्फे उपस्थित करण्यात आला. श्रीमंत कोल्हापूर करायला निघालेल्या पालकमंत्र्यांनी श्रीमंत लोकांसाठी किमान कोल्हापूर शहराची वाट लावू नये, असे आवाहनही आघाडीने केले आहे.
मंगळवारी मंत्रालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत गांधीनगर रस्त्यावरील अवैध बांधकामांबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याने त्यावर कारवाई करू नये, असे राज्य सरकारने निर्देश दिल्यामुळे त्याची प्रतिक्रिया महानगरपालिका वर्तुळात उमटली. याचा काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. महापौर स्वाती यवलुजे, शिक्षण मंडळ सभापती वनिता देठे, महिला बालकल्याण सभापती सुरेखा शहा, गटनेते शारंगधर देशमुख, माजी सभापती संदीप नेजदार, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, संजय मोहिते यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील व आमदार महाडिक यांना श्रीमंतांना एक आणि गरिबांना एक न्याय द्यायचा आहे. एकीकडे शहरात गरिबांवर कारवाई झाली त्यावेळी ही मंडळी कुठे होती. त्यावेळी त्यांना कळवळा आला नाही. गांधीनगर रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्या श्रीमंतांची बाजू घेऊन मतांचे राजकारण करताना मात्र कळवळा आला. नियम न पाळता जर इमारती बांधल्या असतील तर कायद्याने कारवाई झालीच पाहिजे, अशी आमची मागणी आहे, अशी अपेक्षा शारंगधर देशमुख यांनी व्यक्त केली.
येथून पुढे शहरात अतिक्रमण काढण्याची विनापरवाना बांधकामे तोडण्याची मोहीम मनपा प्रशासनाने हाती घेतली तर पक्ष म्हणून नाही तर नगरसेवक म्हणून रस्त्यावर उतरून ही कारवाई बंद पाडू, असा इशारा देशमुख यांनी दिला. यावेळी संरक्षण नाकारणाऱ्या पोलीस प्रशासनाचाही निषेध करण्यात आला.
तेथे कचरा टाकणार : महापौर
शहरात एकीकडे कचरा टाकण्यास जागा नाही, आणि दुसरीकडे कचरा डेपोसाठी आरक्षित असलेल्या जागेवरील झालेली अतिक्रमणे तोडू नका, असा आदेश दिला जातो ही लाजीरवाणी बाब आहे. जी जागा कचरा डेपोसाठी आरक्षित आहे, तेथे यापुढे कचरा नेऊन टाकण्याचे आदेश प्रशासनाला दिले जातील, असे महापौर यवलुजे यांनी सांगितले.

Web Title: Do not wait for the city to be 'rich'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.