बोटीतून स्थलांतराची वाट बघू नका, कोल्हापुरातील संभाव्य पूरस्थितीवरुन पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बजावले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 12:48 PM2023-07-25T12:48:42+5:302023-07-25T12:49:25+5:30

आजपासून स्थलांतर सुरू करण्याचे आदेश

Do not wait for evacuation by boat, the guardian minister warned the officials regarding the possible flood situation in Kolhapur | बोटीतून स्थलांतराची वाट बघू नका, कोल्हापुरातील संभाव्य पूरस्थितीवरुन पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बजावले 

बोटीतून स्थलांतराची वाट बघू नका, कोल्हापुरातील संभाव्य पूरस्थितीवरुन पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बजावले 

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यातील पावसाचा जोर असाच राहिला तर राधानगरी, कुंभी, कासारी या तीन धरणातील पाण्याचा विसर्ग आज मंगळवारी सुरू होऊन पूर येण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे अजून २४ तास आणि याआधीच्या दोन पुरांचा अनुभव आहे, त्यामुळे विसर्ग सुरू झाल्यावर लोकांच्या दारात पूर येईपर्यंत वाट न बघता तातडीने आज, मंगळवारपासूनच नागरिकांचे स्थलांतर करा.

यंदा कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचे बोटीतून स्थलांतर होणार नाही. बोटी फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जातील.. अशी सक्त ताकीद पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिली.

संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्री केसरकर यांनी सोमवारी कोल्हापूरसह जिल्ह्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी या पूरबाधित होणाऱ्या गावांना भेटी दिल्या. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने आदी उपस्थित होते.

पालकमंत्री केसरकर म्हणाले, आज मंगळवारी सायंकाळपर्यंत राधानगरीतील व त्यानंतर एका दिवसाने कुंभी कासारीतून विसर्ग सुरू होईल. यामुळे किमान ५ फुटांनी पाणी वाढून धोका पातळी ओलांडेल. आयत्या वेळी बोटीतून स्थलांतर करणे त्रासाचे होते व लोकांच्या जीवाला धोका असतो. जनावरांचा मृत्यू होतो. तशी वेळ येऊ नये यासाठी सोमवारी रात्रीपर्यंत पाणी खाली गेले नाही तर मंगळवारी स्थलांतर सुरू करा.

स्थलांतरासाठी बोटींचा वापर होणार नाही. नागरिकांची खासगी वाहने असतील. एसटी बसेसमधून स्थलांतर करा. त्यासाठी ठिकाणानुसार जबाबदारी निश्चित करा. धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर काेल्हापुरात पाणी यायला किमान १८ तास लागतील, पण त्या अलीकडे असलेल्या भागाची काळजी घ्या. अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी कायम संपर्कात राहा.

अलर्ट करायला आलो आहे..

पालकमंत्री म्हणाले, कोल्हापुरात अजून पूरजन्य स्थिती नसली तरी मी तुम्हाला अलर्ट करायला आलो आहे. धरणातील विसर्ग सुरू झाल्यावर पाण्याची पातळी कोणत्यावेळी, किती वाढते, याची तुम्हाला माहिती आहे. विसर्ग सुरू झाला की किमान १० हजार क्युसेस पाणी नदीत वाढणार. रस्ते बंद होणार, पाणी वाढणार आणि लोक पुरात अडकून पडणार, जेवढा वेळ ते अडकून राहतील तेवढा यंत्रणेवरील ताण वाढेल.

पूर ओसरताच पंचनामे करा..

पूर ओसरला की लगेच शेतीचे पंचनामे सुरू करा. विहिरींमध्ये गेलेल्या पुराच्या पाण्याचा उपसा करणारी यंत्रणा तयार ठेवा. स्थलांतराच्या ठिकाणी डॉक्टर व औषधांचे साठा तयार ठेवा. नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची, जेवणाची सोय करा. जनावरांसाठी चारा तयार ठेवा. सर्व विभागांनी समन्वयाने काम करा, मी म्हणजे तुम्ही आहात असे समजून यंत्रणा राबवा असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Do not wait for evacuation by boat, the guardian minister warned the officials regarding the possible flood situation in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.