पाण्याची चिंता नको; मेअखेर पुरेसा साठा
By admin | Published: April 30, 2017 01:02 AM2017-04-30T01:02:26+5:302017-04-30T01:02:26+5:30
काटकसरीने वापरणे गरजेचे : चित्री, चिकोत्रा खोऱ्यातच टंचाई शक्य
कोल्हापूर : मेच्या अखेरपर्यंत वळीव पाऊस झाला नाही तरी जिल्ह्यातील शेतीला व पिण्यासाठी लागणारा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी बुधवारी दिली. पाणी उपलब्ध असले तरी लोकांनी त्याचा काटकसरीने वापर करावा व यापुढील काळात शेतीसाठी ठिबक सिंचनला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सोमवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई निवारणाची बैठक झाली. त्यामध्ये टंचाईग्रस्त गावांची नावे जाहीर करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर टंचाईची तीव्रता नक्की किती आहे, यासंबंधीची माहिती ‘लोकमत’ने घेतली.
कोल्हापूर हा ‘पाणीदार जिल्हा’ असल्याने अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठीही फारशी कधी टंचाई भासत नाही. आता जी ७३ गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत, त्यास प्रशासनाचा गलथानपणा आणि काही ठिकाणी गावांचेही दोष कारणीभूत आहेत. गतवर्षी पर्जन्यमान चांगले झाले आहे. सगळे पाटबंधारे प्रकल्प भरले होते. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र झाल्या तरी पाण्यासाठी चिंता करण्याचे कारण नाही. शेतीसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध आहे. साधारणत: मे अखेरपर्यंत पाऊस झाला नाही तरी काळजी करण्याचे काम नाही; परंतु मान्सून लांबलाच तर मात्र अडचणी येऊ शकतात. आपल्याकडे साधारणत: मे मध्ये एक-दोन चांगले वळीव होतात तसे झालेच तर पिकांची एका पाण्याची तहान भागू शकते. जिल्हा परिषद प्रतिवर्षी टंचाईचा आराखडा तयार करते, परंतु तो अंमलात कमी व कागदावरच जास्त राहतो. हा आराखडा जिल्हा प्रशासनाला सादर होऊन मंजुरीची प्रक्रिया होईपर्यंत एखादा पाऊस होतो व टंचाईची तीव्रता कमी झाली की, त्या आराखड्याचे पुढे काय झाले हे पुढील वर्षाचा मे उजाडेपर्यंत कोण पाहत नाही. (प्रतिनिधी)
१चित्री, चिकोत्राचे नियोजन
चित्री प्रकल्पामध्ये ००.४०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. एका उन्हाळी आवर्तनासाठी ००.२५० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता आहे. उर्वरित साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे मध्यम पाटबंधारे प्रकल्प विभागातून सांगण्यात आले. हिरण्यकेशी नदीवर २८ एप्रिल ते १७ मेपर्यंत व २५ मेपासून अंशत: उपसा बंदी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील ३१ व आजरा तालुक्यांतील २३ गावांचा समावेश होतो.
२ चिकोत्रा प्रकल्पामध्ये ००.२५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठी उपलब्ध आहे. उन्हाळी आवर्तनासाठी ००.१०० दशलक्ष घनमीटर पाण्याची आवश्यकता असून उर्वरित पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पावर २९ एप्रिल ते १४ मे व २६ मे ते १० जूनपर्यंत उपसाबंदी प्रस्तावित करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये कागल तालुक्यातील १९, आजऱ्यातील ३ व भुदरगडमधील ५ गावांचा समावेश आहे.
पाणी वापरते कोण..?
ग्राहकलोकसंख्यावार्षिक वापरउर्वरितसाठी
आवश्यक
महापालिका५ लाख ४९ हजार१.७७६००.४०४
नगरपालिका३ लाख ११ हजार०.०३४००.००८
नगरपरिषद१ लाख १ हजार०.७६००.०१७
ग्रामपंचायती२५ लाख ६५ हजार१.५१८००.३४५
इतर घरगुती९०००.००६००.००१
एमआयडीसी१० हजार ५०००.३६९०.०८४
साखर कारखाने१५ हजार०.४०५०.०९२
इतर उद्योग३ हजार०.१८३०.०४२
एकूण४.३६८०.९९३
वीज जोडण्या
‘महावितरण’कडे ३० मार्च २०१६ अखेर ८१७९ व गतवर्षात ५६७२ असे १३८५१ वीज जोडणी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६७५२ पंपांना वीज जोडणी दिली असून ७०९९ वीज जोडण्या प्रलंबित आहेत. मार्च २०१८ अखेर १० हजार ९९ जोडण्या देण्यात येणार आहेत.