‘भारत-जपान’ने संयुक्तपणे संशोधन करावे
By admin | Published: October 4, 2016 12:34 AM2016-10-04T00:34:15+5:302016-10-04T00:54:09+5:30
हिरोशी तेराडा : वारणानगर येथे संसर्गजन्य रोग व औषध संशोधन परिषद
वारणानगर : संसर्गजन्य रोग व औषध संशोधनासाठी जपान व भारतातील शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे संशोधन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जपानचे प्रख्यात शास्त्रज्ञ हिरोशी तेराडा यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत व्यक्त केले.
वारणानगर येथील श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेज, आय.सी.टी. मुंबई, पर्ड अहमदाबाद, आय.पी.ए. गोवा, टी.एस.टोकियो व जपान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘आशिया खंडातील संसर्गजन्य रोग व औषध संशोधन’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पणजी (गोवा) येथील मॅकनिज् पॅलेस येथे ही भव्य परिषद पार पडली. या परिषदेस जगभरातील २५0 हून अधिक शास्त्रज्ञ व संशोधक उपस्थित होते.
जपानचे शास्त्रज्ञ हिरोशी तेराडा, सलीम वेलजी, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील, अनंत नाईक, डॉ. वंदना पत्रावळे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले.
यावेळी परिषदेत मुंबईसह गोवा, अहमदाबाद टोकियो, जपान, नुपाल्स्, निगाता, जपान, आदी देशांच्या संस्थांमधील नामांकित शास्त्रज्ञ व संशोधकांनी संसर्गजन्य रोगांवरील अत्याधुनिक संशोधन पद्धतीवर मार्गदर्शन केले.
परिषदेत हिरोशी तेराडा व जी. डी. पाटील यांच्या हस्ते ‘सोवेनिअर’चे प्रकाशन करण्यात आले. कोरे फार्मसीचे प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा यांनी सहसंयोजकांची, प्रा. किरण पाटील यांनी गोषवारा पुस्तकाची व डॉ. मंजाप्पा यांनी वैज्ञानिक समितीची जबाबदारी पार पाडली.
परिषदेत घेण्यात आलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत पारीख डी. (निरमा विद्यापीठ, अहमदाबाद), रोहित पवार (आय.सी.टी. मुंबई) व रोनक भूपतानी (मुंबई) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. पर्डचे डायरेक्टर
डॉ. मनीष निवसकर यांनी समारोप आढावा घेतला, प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा यांनी आभार, तर प्रा. झकी तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजच्यावतीने पणजी येथे ‘आशिया खंडातील संसर्गजन्य रोग व औषध संशोधन’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन जपानचे प्रख्यात शास्त्रज्ञ हिरोशी तेराडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जी. डी. पाटील, प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा, संशोधक, आदी उपस्थित होते.