लोकांचे जोडे आम्ही खायचे का ?
By admin | Published: October 22, 2015 12:32 AM2015-10-22T00:32:55+5:302015-10-22T00:51:22+5:30
सभापतींचा सवाल : ठेकेदारांनी दर्जाहीन कामे करायची, अधिकाऱ्यांनी मजा मारायची
आजरा : आजरा तालुक्यात पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. बंधाऱ्यांमध्ये पाणी साठेल याची शाश्वती नाही. ठेकेदारांनी दर्जाहीन कामे करायची अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन मजा मारायची आणि तालुक्यातील लोकांचे जोडे आम्ही खायचे, असा प्रकार सुरू असून पाणीटंचाइच्या पार्श्वभूमीवर बेफिकीरपणा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दांत सभापती विष्णूपंत केसरकर यांनी जलसंधारणाच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
आजरा पंचायत समितीच्या सभागृहात सभापती केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली टंचाईग्रस्त गावातील पाणीसाठ्याची व आवश्यक उपाययोजनेच्या संदर्भात बैठक पार पडली.
यावेळी तालुक्यातील मलिग्रे येथील पाझर तलावाची गळती, कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची झालेली दुरवस्था याबाबत जोरदार चर्चा झाली. वारंवार बैठका घेऊनही जलसंधारणाचे अधिकारी कोणत्याच बैठकीला उपस्थित राहत नसल्याबद्दल खदखदणाऱ्या रागाचा अखेर सभापती केसरकर यांच्याकडून उद्रेक झाला.
मलिग्रे तलावाच्या बांधकामाचे काम लाखो रुपये खर्चून करण्यात आले; पण अत्यंत निकृष्ट दर्जाचे हे काम झाल्याने तलावात पाणीसाठा होत नाही. यामुळे मलिग्रे परिसरातील गावांचे पाण्याविना प्रचंड हाल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत अधिकारी कंत्राटदारांना पाठीशी घालतात. पाण्याचा पत्ता नाही. कंत्राटदार पैसे मिळवून रिकामे झाले. अधिकारी काय करतात? चांगली कामे का होत नाहीत? पैसे काय झाडाला लागतात का? असा प्रश्न उपस्थित करीत कंत्राटदारांना पोसणे बंद करा, असा सल्ला दिला.
तालुक्यात पाणीसाठा करता येणे शक्य आहे. पण, बंधाऱ्यांकरिता वापरले जाणारे बरगे सडले आहेत. कारणे सांगत बसू नका तर बरग्यांसाठी प्रयत्न करा, असेही सांगितले. पाणीटंचाई प्रश्नाबाबत हलगर्जीपणा केल्याची तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्र ार करण्याचा इशाराही केसरकर यांनी दिला.
चर्चेत कॉ. संपत देसाई, उपसभापती दीपक देसाई, जलसंधारणचे सहायक अभियंता एस. व्ही. दावणे यांच्यासह उपस्थितांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)
पुन्हा अधिकारी गायब
आजची बैठक पूर्व नियोजित असूनही गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी पुन्हा एकवेळ दांडी मारली. सभा सुरू झाल्यानंतर तासाभराने गटविकास अधिकारी आले. तर
इतर अधिकारी नेहमीप्रमाणे भागात होते.
सोहाळे बंधारा
पैसेच नाहीत
सोहाळे बंधाऱ्याच्या ठेकेदाराने सुमारे ३२ लाख रुपये खर्चून बऱ्यापैकी दुरुस्ती केली आहे; पण बिलेच न निघाल्याने पुढची कामे केलेली नाहीत. हा प्रकारही चिंताजनक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.