रुक्मिणीनगरमध्ये आम्ही राहायचे की नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:41 AM2021-02-06T04:41:46+5:302021-02-06T04:41:46+5:30
रक्मिणीनगर ते निरामय हॉस्पिटल या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. कार्यालये, शाळा, बाजार भरण्याच्या सकाळच्यावेळी आणि शाळा, कार्यालये सुटण्याच्या ...
रक्मिणीनगर ते निरामय हॉस्पिटल या मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. कार्यालये, शाळा, बाजार भरण्याच्या सकाळच्यावेळी आणि शाळा, कार्यालये सुटण्याच्या सायंकाळच्या वेळेत या मार्गावर रोज नियमितपणे वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहने आणि त्यांच्या हॉर्नच्या आवाजामुळे ध्वनी, तर धुरामुळे वायू प्रदूषणाचा त्रासही होत आहे. त्याचा स्थानिक ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, अन्य नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. एकूणच वाहतुकीच्या कोंडीमुळे या रक्मिणीनगराचे स्वास्थच हरवून बसले आहे. या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीला शिस्त लावून आम्हाला दिलासा देण्याचे काम प्रशासनाने करावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे. (उत्तरार्ध)
चौकट
बेशिस्त वाहनधारकांना लगाम घालावा
या मार्गावरील अनेक वाहनधारक बेशिस्तपणे वाहने नेतात. त्यांच्यामुळेच वाहतुकीची कोंडी होऊन सर्वांना त्रास होत आहे. त्यामुळे अशा बेशिस्त वाहनधारकांना लगाम घालण्याच्यादृष्टीने वाहतूक पोलिसांनी पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे.
चौकट
भविष्यात समस्या आणखी गंभीर होणार
उड्डाणपूल ते ताराराणी चौक मार्ग, रुक्मिणीनगर परिसरात काही मोठ्या बांधकाम प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यात काही प्रकल्प हे निवासी आणि व्यावसायिक स्वरूपाचे आहेत. भविष्यात त्याठिकाणी नागरिकांची आणि पर्यायाने वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या आणखी गंभीर होणार आहे. ते लक्षात घेऊन महापालिका, वाहतूक पोलीस प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
पॉंईटर
वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हे करता येईल
१) टेंबलाईवाडी उड्डाणपुलावरून ताराराणी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावरील युटर्न मनाईची अंमलबजावणी त्वरित सुरू करावी.
२) युटर्न मनाईचा फलक असलेल्या ठिकाणी बॅरिकेटस लावून तेथे खुला असलेला मार्ग बंद करावा.
३) वाहतूक पोलीस विभागाने घोषित केलेल्या वन-वे (एकेरी) मार्गाची सक्ती तातडीने राबवावी.
४) उड्डाणपुलाच्या रक्मिणीनगरकडील बाजूला सीसीटीव्ही बसविण्यात यावेत.
५) रक्मिणीनगर ते निरामय हॉस्पिटल या मार्गावर टेम्पो, ट्रॅक्टर-ट्रॉली, आदी अवजड वाहनांना बंदी घालावी.
६) उड्डाणपुलावरून व्हिक्टर पॅलेसकडील सेवा रस्ता, वायचळ पथ, महाडिक वसाहतीकडे जाणारी वाहने सेवंथ डे स्कूलच्या चौकातून वळण घेऊन येण्याची व्यवस्था करावी.
प्रतिक्रिया
रोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीला आम्ही सर्व स्थानिक नागरिक त्रस्त आहोत. आमच्या नगरातील मार्गावर वाहने नेण्यासाठी केलेल्या नियमांचे पालन वाहनधारकांकडून होण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी कार्यवाही करावी. पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन वाहतूक कोंडीच्या समस्येतून आम्हाला मुक्त करावे.
-ॲड. अभिजित भोसले, नागरिक, रुक्मिणीनगर
फोटो (०४०२२०२१-कोल-रूक्मिणीनगर रस्ता ०८) : कोल्हापुरातील रुक्मिणीनगर ते निरामय हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता हा अंतर्गत रस्ता असल्याने कमी रुंदीचा आहे. त्यावरून दुहेरी वाहतूक होत असल्याने रोज वाहतुकीची कोंडी होत आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)