कुटुंबाप्रमाणे उमेदवारांचे काम करा

By admin | Published: February 1, 2017 11:07 PM2017-02-01T23:07:47+5:302017-02-01T23:07:47+5:30

नारायण राणे : वेंगुर्लेत काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा; इच्छुक उमेदवारांचा घेतला आढावा

Do the work of the candidates like the family | कुटुंबाप्रमाणे उमेदवारांचे काम करा

कुटुंबाप्रमाणे उमेदवारांचे काम करा

Next

वेंगुर्ले : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये १०० टक्के यश मिळविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा. काँग्रेस पक्ष हे आपले एक कुटुंब आहे. या कुटुंबातील इच्छुक सर्वच उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट मिळणार नाही, पण तिकीट न मिळालेल्या उमेदवारांनी नाराज न होता पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करावा. तुमच्या प्रामाणिकपणाची व निष्ठेची पक्ष नक्कीच दखल घेईल, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ले येथील पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान केले.
वेंगुर्ले येथे हॉटेल कोकण किनारामध्ये तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांबरोबर आयोजित केलेल्या बैठकीमध्ये नारायण राणे बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निकिता परब, तालुकाध्यक्ष मनीष दळवी, विभागीय अध्यक्ष विलास ठाकूर, राजबा सावंत, देऊ साळगावकर, मनवेल फर्नांडिस, प्रकाश राणे, माजी महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, नीलेश सामंत, दादा कुबल, समीर नाईक, जयप्रकाश चमणकर, वंदना किनळेकर, सारिका काळसेकर, वसंत तांडेल, जगन्नाथ डोंगरे, चित्रा कनयाळकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रीतेश राऊळ, बाळू परब, नगरसेवक विधाता सावंत, कृतिका कुबल, शीतल आंगचेकर, पूनम जाधव आदींसह तालुक्यातील पदाधिकारी, इच्छुक उमेदवार यावेळी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान प्रथम राणे यांनी प्रत्येक विभागीय अध्यक्षांकडून त्या त्या भागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुक उमेदवारांची माहिती जाणून घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करावी की नाही याबाबतही काहींनी आपली मते मांडली. तर तालुकाध्यक्ष दळवी यांनी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समितीच्या निवडणुकीत आपण जे उमेदवार द्याल, त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उपस्थितांचे आभार वसंत तांडेल यांनी मानले. (प्रतिनिधी)


सरकारची फसवेगिरी लोकांना सांगा
म्हणूनच या निवडणुकीच्या प्रचाराला जाताना सरकारची फसवेगिरी लोकांना सांगा. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अंतिम उमेदवार निवडीची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता आहे, अशांनाच काँग्रेस पक्षाचे तिकीट दिले जाणार आहे. मात्र, ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांनी नाराज होऊ नये. तुमचाही विचार भविष्यात पक्ष नक्की करेल, असेही त्यांनी सांगितले.


जिल्ह्याचा विकास थांबला आहे
सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर व इच्छुक उमेदवारांबाबत माहिती घेतल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी सत्तास्थाने आजही काँग्रेसकडे आहेत. या जिल्ह्यातील जनतेचा आपल्यावर विश्वास आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रचाराला जाताना मोदी लाटेची हवा येऊन केंद्र्रात व राज्यात सत्तेत आलेल्या सेना-भाजपच्या सरकारमुळे जनतेचे कसे नुकसान होत आहे, हे त्यांना पटवून सांगा. नोटाबंदीच्या नावाखाली झालेल्या कारवाईत सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागला. आजही स्वत:चे बँकेतील पैसे काढण्यासाठी या सरकारने मर्यादा ठेवल्या आहेत. अशी कारवाई करणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. या नोटाबंदीमुळे बाजारपेठा मंदीच्या छायेत आहेत. व्यापार, उद्योग थांबले आहेत. सरकारची ही चुकीची धोरणे लोकांना जाऊन सांगा. सिंधुदुर्ग हा देशातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे, पण या जिल्ह्याचा विकास थांबला आहे.

Web Title: Do the work of the candidates like the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.