मेघडंबरीचे काम लवकर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:24 AM2017-09-27T00:24:22+5:302017-09-27T00:24:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम येत्या दीड महिन्यात पूर्ण करण्यात यावे, त्याचवेळी समाधी परिसरातील अन्य विकास कामेही पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचना महापौर हसिना फरास यांनी मंगळवारी शिल्पकार तसेच ठेकेदार यांना दिल्या.
महापौर हसिना फरास यांनी मंगळवारी दुपारी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्यासमवेत जाऊन समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम केले जात असलेल्या कार्यशाळेत जाऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी गटनेते सत्यजित कदम, राजसिंह शेळके, माजी नगरसेवक आदिल फरास, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहायक आयुक्त संजय सरनाईक, उपशहर अभियंता एस. के. माने, हर्षजित घाटगे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, ठेकेदार अभिजित जाधव, शिल्पकार किशोर पुरेकर, आदी उपस्थित होते.
मेघडंबरीचे काम पूर्ण व्हायला किमान तीन महिने लागतील, असे शिल्पकार किशोर पुरेकर यांनी यावेळी सांगितले. तथापि महापौर फरास यांनी जादा मजूर घ्या, रात्रं-दिवस काम करा; पण दि. १५ नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करावे, अशी सूचना केली. समाधिस्थळ परिसरात करावयाची अन्य विकासकामेही तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना महापौरांनी शहर अभियंत्यांना केली.
कास्टिंगचे काम ४ आॅक्टोबरनंतर सुरू!
सिद्धार्थनगराला लागून असलेल्या नर्सरी बागेत छत्रपती शाहू महाराजांची समाधी बांधण्यात येत आहे. आधीच्या नियोजनाप्रमाणे समाधिस्थळावर दगडी मेघडंबरी तयार करायची होती; परंतु नंतर ती पंचधातंूची करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार त्याचे डिझाईन केले आहे. गेल्या सहा महिन्यांत या मेघडंबरीचे क्ले मॉडेल तयार झाले आहे. प्रत्यक्ष जागेवर ही मेघडंबरी बसवून पाहिली जाणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे दि. १ आॅक्टोबरला जागेवर प्रात्यक्षिक होईल. सर्व बाजूने ती जर व्यवस्थित उभी राहिली, तर मग त्याचे कास्टिंगचे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे दि. ४ किंवा ५ आॅक्टोबरनंतर कास्टिंगचे काम सुरू होईल.