पवारांपेक्षा स्वत:ला मोठे समजता का; सतेज पाटील यांची धनंजय महाडिकांना विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:56 AM2019-04-05T00:56:17+5:302019-04-05T00:56:23+5:30
कोल्हापूर : गेली पाच वर्षे प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करणारे खासदार धनंजय महाडिक हे स्वत:ला पक्षाध्यक्ष शरद पवार ...
कोल्हापूर : गेली पाच वर्षे प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करणारे खासदार धनंजय महाडिक हे स्वत:ला पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा मोठे समजतात काय? अशी विचारणा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली. वाटेल तेव्हा वाटेल त्या पद्धतीने वागण्याच्या प्रवृत्तीला कोल्हापुरातील स्वाभिमानी जनतेने हद्दपार करायचे ठरविले आहे, याची जाणीव झाल्यानेच आपण हतबल व अस्वस्थ झाला असल्याचा टोला या पत्रात त्यांनी लगावला आहे.
दोन दिवसांपूर्वीच खासदार महाडिक यांनी पक्षविरोधी भूमिका घेणारे आमदार पाटील हे स्वत:ला राहुल गांधी यांच्यापेक्षा मोठे समजतात काय, अशी विचारणा केली होती. त्यास या पत्रकाद्वारे त्यांनी प्रत्युत्तर दिले.
आमदार पाटील म्हणतात, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार म्हणून गेल्या निवडणुकीत तुम्ही विजय मिळविला; पण त्यानंतर सगळे पक्ष आपल्याच खिशात आहेत, आम्ही कसेही वागू, अशी तुमची अहंकारी भाषा होती. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, विधान परिषद, त्याचबरोबर विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या. या सर्व निवडणुकांमध्ये तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षांच्या विरोधात भूमिका घेतली. तुम्ही ज्या राष्ट्रवादी पक्षाचे खासदार आहात त्या पक्षाच्या ‘घड्याळ’ या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवारांचा जाहीर प्रचार कोणत्या निवडणुकीत केला, याचे एकतरी उदाहरण दाखवून द्या. याउलट राष्ट्रवादीबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चुलीत पाणी ओतायचे काम केले. महानगरपालिका निवडणुकीत धर्मसंकट आहे म्हणून राष्ट्रवादीचा प्रचार न करता परदेशात गेल्याचे सांगितले; पण प्रत्यक्षात रुईकर कॉलनीतील भाजप आमदार भावाच्या कार्यालयात बसून काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी जोडण्या लावल्या.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पाडण्यासाठी तुम्ही सक्रिय होता. तुम्ही पाच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कोणत्या कार्यकर्त्याला एखाद्या ठिकाणी पदाधिकारी होण्यासाठी प्रयत्न केले हे जरा आठवून सांगा. याउलट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या स्नुषा मेघा पाटील यांच्या स्थायी सभापती निवडीवेळी आपल्या बंगल्यात बैठक घेऊन त्यांच्या पराभवासाठी रणनीती आखली. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष राजू लाटकर हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत असताना तुमच्या नातेवाइकांनी त्यांच्यावर हल्ला केला. सदर बझार येथे आलेल्या आमदार हसन मुश्रीफ यांच्या गाडीवर तुमच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यावेळी तुम्ही का लक्ष घातले नाही? या सर्व गोष्टी करताना तुम्ही राष्ट्रवादी पक्षापेक्षा मोठे होता का, असेही या पत्रकात म्हटले आहे.