व्यायाम करताना हृदयविकाराच्या धक्क्याने डॉक्टराचा मृत्यू, कोल्हापुरातील गडहिंग्लजमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 02:11 PM2023-06-21T14:11:43+5:302023-06-21T14:12:27+5:30
नेहमीप्रमाणे घरीच पहिल्या मजल्यावर व्यायाम करीत असताना घडली दुर्घटना
गडहिंग्लज : ट्रेडमिलवर व्यायाम करून वजन उचलताना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसून प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. प्रमोद दुंडाप्पा तथा पी. डी. कल्याणशेट्टी (वय ६५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी (२०) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. आज, बुधवारी (२१) सकाळी १० वाजता येथील बेलबागनजीकच्या लिंगायत दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील सरस्वतीनगरात राहणाऱ्या डॉ. कल्याणशेट्टी यांचा दवाखाना शहरातील चर्च रोडनजीक आहे. डॉ. कल्याणशेट्टी हे शल्यविशारद तर त्यांच्या पत्नी रूपा या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. मंगळवारी (२०) सकाळी डॉ. कल्याणशेट्टी हे नेहमीप्रमाणे बंगल्यातील पहिल्या मजल्यावर व्यायाम करीत होते. काहीवेळ ट्रेडमिलवर व्यायाम केल्यानंतर वजन उचलताना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने ते खाली कोसळले.
आवाजामुळे डॉ. रूपा या धावून गेल्या. त्यांनी तत्काळ उपचारासाठी त्यांना देसाई हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. गडहिंग्लज मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती.
सीमाभागात हळहळ..!
डॉ. कल्याणशेट्टी हे मूळचे गोकाकचे. वडिलांच्या नोकरीमुळे ते बेळगावला स्थायिक झाले होते. त्यानंतर चार दशकापूर्वी ते गडहिंग्लजला आले. काही काळ त्यांनी येथील मिशन हॉस्पिटलमध्ये सेवा केली. त्यानंतर त्यांनी लाटकर गल्लीत भाडोत्री इमारतीत दवाखाना सुरू केला. कालांतराने चर्चरोडवर स्व:मालकीच्या इमारतीत दवाखाना सुरू केला. प्रेमळ व मनमिळावू स्वभाव आणि कन्नड भाषिक असल्यामुळे गडहिंग्लजच्या पूर्वभागासह सीमाभागातील अनेक रुग्ण त्यांच्याकडे आवर्जून उपचारासाठी येत.