बेळगावहून आलेला डॉक्टर परिवार १४ दिवसांसाठी अलगीकरणामध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 01:08 PM2020-04-16T13:08:04+5:302020-04-16T13:12:02+5:30
त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून या तिघांनाही ‘सीपीआर’मध्ये पाठविण्यात आले. ‘सीपीआर’मध्ये या तिघांचीही तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी संस्थात्मक अलगीकरणासाठी पाठविण्यात आले.
कोल्हापूर : नातेवाइकांकडे राहून कंटाळलेला डॉक्टर परिवार बेळगावहून कोल्हापुरात आला खरा; परंतु नागरिकांच्या दबावामुळे तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी संस्थात्मक अलगीकरणामध्ये जावे लागले. येथील महाडिक कॉलनीमधील नागरिकांनी डॉक्टरांना सक्तीने सीपीआर रुग्णालयामध्ये जाण्यास भाग पाडले. बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.
येथील महाडिक कॉलनीतील डॉ. एन. एन. पावसकर हे पत्नी, मुलासह २१ मार्च रोजी बेळगावला नातेवाइकांकडे गेले होते. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर लॉकडाऊन झाले आणि ते तेथेच अडकले. इतके दिवस राहिल्यानंतर त्यांनी डॉक्टर असल्याने ‘अत्यावश्यक बाब’ या सदराखाली त्यांनी बेळगावच्या पोलीस अधीक्षकांचे पत्र घेतले.
सकाळी ११ वाजता आपल्या सॅँट्रो गाडीतून हे तिघेही भगीरथी अपार्टमेंटमधील घरी आले. बेळगावहून डॉक्टर आलेत ही बातमी कॉलनीमध्ये पसरली. तेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना सीपीआर रुग्णालयात जाऊन तपासणी करून येण्याचा सल्ला दिला; परंतु मी डॉक्टर असल्याने मला माहीत आहे. तपासणीची काही गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.
मग मात्र शेजाऱ्यांनी कॉंग्रेस सेवा दलाचे पदाधिकारी संजय पवार-वाईकर यांना ही माहिती दिली. वाईकर यांनी तातडीने जिल्हा, महापालिका आणि पोलीस अधिकाºयांना ही माहिती दिल्यानंतर यंत्रणा हलली. महापालिकेच्या डॉ. रती अभिवंत, सुवर्णा घाटगे, प्रचिती पखाने, रूपाली सासने यांनी तातडीने पावसकर यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून या तिघांनाही ‘सीपीआर’मध्ये पाठविण्यात आले. ‘सीपीआर’मध्ये या तिघांचीही तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी संस्थात्मक अलगीकरणासाठी पाठविण्यात आले.
डॉक्टर आत आले कसे ?
परजिल्ह्यांतून येणा-यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो. कोगनोळी येथील चेकपोस्टवरून हा परिवार चौकशी न करता कोल्हापुरात आला कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, हातावर शिक्का न मारता कोल्हापुरात डॉ. पावसकर यांच्यासारखे कितीजण येतात? नागरिकांनी दबाव टाकला नसता तर त्यांची तपासणी झाली असती का, असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.