डॉक्टरांनो.. ग्रामीण भागात जा : फडणवीस

By admin | Published: April 26, 2015 01:00 AM2015-04-26T01:00:54+5:302015-04-26T01:02:41+5:30

कऱ्हाडात आवाहन : कृष्णा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा उत्साहात

Doctor ... go to the rural areas: Fadnavis | डॉक्टरांनो.. ग्रामीण भागात जा : फडणवीस

डॉक्टरांनो.. ग्रामीण भागात जा : फडणवीस

Next

कऱ्हाड : ‘कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठ हे अखंड महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ असून, या विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षणात आपली गुणवत्ता सप्रमाण सिद्ध केली आहे. भारताच्या ग्रामीण भागात आजही आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या असून, या समस्या दूर करण्यासाठी शासनाला वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील सेवेला प्राधान्य देऊन ग्रामीण भारताच्या आरोग्य सुधारणेचे आव्हान स्वीकारावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कऱ्हाडला कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या चौथ्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिंंगारे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर तावरे, कुलगुरू डॉ. ए. व्ही. नाडकर्णी, आरोग्य विज्ञान संचालक डॉ. आर. के. अयाचित, विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य विनायक भोसले, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. आर. के. गावकर, वित्त अधिकारी पी. डी. जॉन आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यात विद्यापीठातील ४२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये डॉ. स्वप्नील लाळे, नेत्रावती व्ही. आणि प्रतिभा साळवी यांना कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते पी.एचडी. पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध अधिविभागांत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आज तुम्ही वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी घेऊन पदवीधर बनला आहात. तुम्ही डॉक्टर झाला म्हणजे आता समाजाकडून तुमच्या अपेक्षाही वाढल्या आहेत, याचे भान ठेवा. समाजासाठी असणारे उत्तरदायित्व पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुढे आले पाहिजे. जगात सर्वात मोठे युवा मनुष्यबळ आपल्या देशात असून, या मनुष्यबळात समाज बदलण्याची ताकद आहे. जो आव्हाने स्वीकारतो, त्यालाच युवक म्हटले जाते.’
माजी अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘गेल्या तीस वर्षांपासून मी कृष्णा विद्यापीठाचे कार्य पाहत आहे. ज्या काळात शिक्षणाचा विचारही रुजलेला नव्हता, अशा काळात सहकारमहर्षी दिवंगत जयवंतराव भोसले यांनी शेतकऱ्याच्या मुलाला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न पाहिले आणि हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी या मेडिकल कॉलेजची स्थापना केली. जे आज अभिमत विद्यापीठ म्हणून देशात नावारूपाला आले आहे, याचा मला अभिमान वाटतो.’
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘शिक्षण हा प्रगतीचा मार्ग आहे, ही भूमिका बाळगून दिवंगत जयवंतराव भोसले यांनी कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टीतूनच हे विद्यापीठ साकारले असून, आता हे विद्यापीठ देशातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनत आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कृष्णा हॉस्पिटल हे ग्रामीण महाराष्ट्रातील महत्त्वाचे रुग्णालय असून, तळागाळातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा माफक दरात देण्याचा प्रयत्न हॉस्पिटलमार्फत सातत्याने केला जातो. कृष्णा विद्यापीठ व कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध प्रकारच्या संशोधन कार्याला सातत्याने चालना दिली जात असून, या संशोधन कार्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता मिळत आहे.’
कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, प्रशासकीय अधिकारी डॉ. आर. जी. नानीवडेकर, वैद्यकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली मोहिते, डेंटल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पवार, फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. वरदराजुलू, बायोटेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. सी. काळे, विद्यापीठ व्यवस्थापकीय मंडळाच्या सदस्या डॉ. सुजाता जाधव उपस्थित होत्या. तसेच या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील, दीपक पवार आदींसह मान्यवर, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सू टिंंग लिम ठरली पाच पदकांची मानकरी
विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येणाऱ्या दिवंगत जयवंतराव भोसले सुवर्णपदकाची मानकरी विद्यार्थिनी मोनिका सोनवणे ठरली. तिला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. तर एमबीबीएस अधिविभागातील सू टिंंग लिम या विद्यार्थिनीने सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येणारे दिवंगत गोविंंद विनायक अयाचित सुवर्णपदक, यूएसव्ही पदक, डॉ. व्ही. के. किर्लोस्कर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीसाठीचा डॉ. एम. एस. कंटक पुरस्कार आणि डॉ. आर. एस. कोप स्मृती पुरस्कार पटकावून सर्वाधिक पाच पदकांची मानकरी ठरली. याचबरोबर डॉ. अक्षय नवलकिशोर लखोटिया, इव्हॉन याँग पै सेज, टॅन चियू वॉन, डॉ. झील राजेंद्र शहा, डॉ. आकाश जैन या विद्यार्थ्यांनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

Web Title: Doctor ... go to the rural areas: Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.