कोल्हापुरात कोरोनाबाधित डॉक्टरच्या दवाखान्यातील महिला कर्मचारीही पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 02:16 PM2020-06-08T14:16:58+5:302020-06-08T14:36:23+5:30
कोल्हापूर शहरातील कोरोनाबाधित डॉक्टरच्या दवाखान्यातील महिला कर्मचारीही पॉझिटिव्ह आढळली आहे. कोल्हापुरात रंकाळा टॉवर परिसरातील ३२ वर्षीय डॉक्टरनाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचा चाचणी अहवाल रविवारी दुपारी आल्याने खळबळ माजली होती.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कोरोनाबाधित डॉक्टरच्या दवाखान्यातील महिला कर्मचारीही पॉझिटिव्ह आढळली आहे. कोल्हापुरात रंकाळा टॉवर परिसरातील ३२ वर्षीय डॉक्टरनाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचा चाचणी अहवाल रविवारी दुपारी आल्याने खळबळ माजली होती.
डॉक्टरांचे स्वत:चे रुग्णालय असून, ते सीपीआर, महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयासह एका खासगी रुग़्णालयात मानसेवी डॉक्टर म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांचा अनेकांशी संपर्क आल्याने संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, रविवारी दिवसभरात नवे १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर २५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ६८० पर्यंत पोहोचली आहे.
गेले आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित नवे रुग्ण कमी प्रमाणात सापडत असल्याचे तसेच उपचाराअंती बरे होऊन बाहेर पडणाऱ्यांचेही प्रमाण मोठे असल्याचे दिलासादायक चित्र होते; पण रविवारी दिवसभरात पुन्हा १९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने पुन्हा आरोग्य विभागाची चिंता वाढली.
विशेष म्हणजे, दिवसभरात चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये कोल्हापूर शहरातील रंकाळा टॉवर परिसरातील ३२ वर्षीय डॉक्टरांचा समावेश आहे. या डॉक्टरांचे रंकाळा टॉवर परिसरात स्वत:चे रुग्णालय आहे. त्याशिवाय ते सीपीआरसह महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालय व एका खासगी रुग्णालयात मानसेवी डॉक्टर म्हणून सेवा बजावत आहेत. सोलापुरातील त्यांच्या एका कोरोनाबाधित नातेवाइकाशी त्यांचा संपर्क आल्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली; पण त्यानंतर डॉक्टरांचा इतरांशी आलेला संपर्क पाहता आरोग्य विभागाने संसर्ग वाढण्याचीही भीती व्यक्त केली आहे.
रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील १९ केंद्रांवर एकूण १६०७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्याने सुमारे १९९ जणांच्या घशातील स्रावांची चाचणी घेऊन ते तपासणीसाठी पाठवले; तर दिवभरात २४० चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यांमध्ये २१८ निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह चाचणी अहवाल आलेल्या १९ रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरात १, आजरा तालुका ५, चंदगड ५, गडहिंग्लज २, हातकणंगले १, शाहूवाडी ५ यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ६८० वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण आठजणांचा मृत्यू झाला आहे.
४५५ रुग्णांना डिस्चार्ज
आज सकाळी १० वाजेपर्यंत एकही पॉझीटिव्ह रूग्ण आढळून आला नाही. आजअखेर जिल्ह्यात एकूण २१७ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचाराअंती बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४५५ पर्यंत पोहोचली आहे, त्यांना डिस्चार्ज देऊन घरी पाठविले आहे. त्यात दिवसभरात डिस्चार्ज दिलेल्या २५ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित संख्या (तालुकानिहाय) :
आजरा- ७२, भुदरगड- ६७, चंदगड- ७२, गडहिंग्लज- ७७, गगनबावडा- ६, हातकणंगले- ७, कागल- ५५, करवीर- १४, पन्हाळा- २५, राधानगरी- ६३, शाहूवाडी- १७४, शिरोळ- ७, नगरपरिषद क्षेत्र- ११, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- २२, इतर जिल्हे व राज्य- ८ (पुणे - १, सोलापूर- ३, मुंबई- १, कर्नाटक- २ आणि आंध्रप्रदेश- १). एकूण रुग्ण- ६८०.