डॉक्टर सचिन यांचाही मृत्यू, भीषण दुर्घटनेत अवघे कुटुंबच संपले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 09:17 PM2022-03-14T21:17:57+5:302022-03-14T21:31:30+5:30
हत्तरगीनजीकच्या अपघातातील जखमी
कोल्हापूर/ संकेश्वर : पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हत्तरकीनजीक झालेल्या अपघातातील गंभीर जखमी डॉक्टरांचाही उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री मृत्यु झाला. डॉ. सचिन शिवानंद मुरगुडे (वय ४५) असे त्यांचे नाव आहे. या दुर्घटनेत त्यांचे अवघे कुटुंबच काळाने हिरावून नेले.
रविवारी (१३) दुपारी झालेल्या अपघातात सचिन यांच्या पत्नी डॉ. श्वेता (वय ४१) व मुलगी श्रेया (वय ७) यांचा जागीच मृत्यु झाला. तर डॉ. सचिन हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर बेळगावच्या के. एल.ई. इस्पितळात उपचार सुरू होते. रात्री पावणे एकच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. येथील तरूण नेत्ररोग तज्ज्ञ डॉ सचिन हे रविवारी दुपारी पत्नी श्वेता व कन्या श्रेया यांच्यासह काही कामानिमित्त बेळगावला गेले होते. बेळगावहून संकेश्वरला येताना हत्तरकीनजीक बेनकोळीजवळ इनोव्हा कारवरील ताबा सुटल्यामुळे रस्त्यालगत थांबलेल्या मालवाहू कंटेनरवर कार जोरात आदळून हा अपघात झाला.
सीमाभागात हळहळ..!
सोमवारी (१४) दुपारी उत्तरीय तपासणीनंतर तीनही मृतदेहांवर कणंगला येथे एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संकेश्वरसह सीमा भागात हळहळ व्यक्त होत आहे.