डॉक्टरला मारहाण; तिघे अटकेत...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2017 12:40 AM2017-03-25T00:40:06+5:302017-03-25T00:40:06+5:30
माजी नगरसेवकाचा समावेश; रुग्णालयाचे बिल कमी करण्यावरून घटना
कोल्हापूर : उद्यमनगर येथील लक्ष्मीनारायण जनसेवा या विश्वस्त संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या पंत वालावलकर रुग्णालयाच्या डॉक्टरला बिल कमी करण्याच्या वादातून माजी नगरसेवकासह तिघांनी कानशिलात लगावत मारहाण केली. डॉ. याकूबखान नजरखान पठाण (वय ३८, रा. कागल) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या कानाला दुखापत झाली आहे.
या प्रकरणी डॉक्टर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी संशयित माजी नगरसेवक रफिक निसार मुल्ला (४५) त्याचे साथीदार मयूर दत्तात्रय पाटील (३०), हसन रफिक शेख (२८, सर्व रा. यादवनगर) यांना अटक केली.
अधिक माहिती अशी, विश्वनाथ ज्ञानू काकडे (५५, रा. कराड) यांना मधुमेहाचा त्रास आहे. पायाला गंभीर जखम झाल्याने त्यांना उद्यमनगर येथील लक्ष्मीनारायण जनसेवा या विश्वस्त संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या पंत वालावलकर रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी त्यांना रुग्णालय प्रशासनाने डिस्चार्ज दिला. रुग्णालयाचे बिल चौदा हजार रुपये झाले होते. त्यामुळे काकडे यांनी परिचित माजी नगरसेवक रफिक मुल्ला यांना बिल कमी
करण्यासाठी डॉक्टरांशी बोलण्याची विनंती केली. दुपारी दीडच्या सुमारास रफिक याने डॉ. पठाण यांना मोबाईलवर संपर्क
साधत मी माजी नगरसेवक आहे. लोक माझ्याकडे मदतीसाठी येत असतात.
माझ्या नातेवाइकांचे बिल कमी करून द्यावे, असे सांगितले. त्यावर पठाण यांनी
चार हजार रुपये कमी केल्याचे
सांगितले. मुल्ला यांनी असे चालणार नाही, आणखी बिल कमी केले पाहिजे, असे सांगितले. यावरून दोघांच्यात
वादावादी झाली. समोर रुग्ण असल्याने डॉ. पठाण यांनी मोबाईल बंद केला.
त्यानंतर रफिक हा मित्र मयूर पाटील, हसन शेख यांना घेऊन रुग्णालयात आला. डॉ. पठाण यांच्या कक्षात घुसून शिवीगाळ करत कानशिलात लगावली. यावेळी सोबतच्या मित्रांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. रुग्णालयात डॉक्टरना मारहाण झाल्याने गोंधळ उडून कर्मचारी घाबरले. इतर रुग्णांचे नातेवाईकही बिथरून गेले. त्यानंतर डॉ. पठाण यांनी या तिघांच्या विरोधात राजारामपुरी पोलिसांत फिर्याद दिली. (प्रतिनिधी)