वरकुटे-मलवडीत डॉक्टर, तलाठी पाहिजेच..!- लोकमतचा दणका..

By admin | Published: July 25, 2014 09:58 PM2014-07-25T21:58:12+5:302014-07-25T22:13:52+5:30

सुविधा पुरवा : चार गावांच्या ग्रामस्थांचे अडीच तास ‘रास्ता रोको’

Doctor, Talathi should be in Varakute-Malwadi ..! - Lokmat Ka Danka .. | वरकुटे-मलवडीत डॉक्टर, तलाठी पाहिजेच..!- लोकमतचा दणका..

वरकुटे-मलवडीत डॉक्टर, तलाठी पाहिजेच..!- लोकमतचा दणका..

Next

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, कुरणेवाडी, महाबळेश्वरवाडी या गावांसाठी कायमस्वरूपी गावकामगार तलाठी आणि दवाखान्यात डॉक्टरची नेमणूक करण्याच्या मागणीसाठी शेतकरी व तरुण कार्यकर्त्यांनी अडीच तास ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. ग्रामस्थांनी आपल्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतल्या. वरकुटे-मलवडीसह चार गावांचे तलाठी कार्यालय वरकुटे-मलवडी येथे आहे. मात्र, गेले वर्षभर पूर्णवेळ काम करणारा गावकामगार तलाठी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांची कामे रखडली आहेत. शिवाय या चार गावांतील सर्वसामान्य ग्रामस्थांना वैद्यकीय सेवा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आणि वरिष्ठांना भावना कळविण्यात आल्या. या दोन्ही समस्या ‘लोकमत’ने प्रभावीपणे मांडल्या होत्या. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता वरकुटे-मलवडी एसटी थांबा चौकात चार गावांतील शेतकरी आणि कार्यकर्ते जमले. शांततेच्या मार्गाने ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले. साडेअकरा वाजता म्हसवडचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. कोरे यांच्यासमवेत आलेल्या महसूल अधिकाऱ्यांनी तलाठी म्हणून अमित शांताराम कुकडे यांची नियुक्ती प्रांताधिकाऱ्यांनी केल्याचे जाहीर केले. तसे नियुक्तिपत्र ग्रामस्थांना वाचून दाखविण्यात आले. सध्या पदभार स्वीकारलेले तलाठी सुरेश बदडे यांनी एक आॅगस्टला नवीन तलाठी रुजू होईपर्यंत तलाठी कार्यालयात थांबून शेतकऱ्यांची कामे करण्याची ग्वाही दिली. पुळकोटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी आयुर्वेदिक दवाखान्यात डॉक्टरांच्या नियुक्तीसंदर्भात सविस्तर माहिती दिली आणि वरकुटे-मलवडी येथे आरोग्यसेविका पूर्णवेळ थांबून रुग्णांची देखभाल करतील, असे ग्रामस्थांना सांगितले. तसेच दवाखाना आजपासून दररोज उघडला जाईल, याचीही हमी दिली. शुक्रवार हा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने डॉ. कोडलकर यांनी दुपारपासून अर्धा दिवस गावातील आयुर्वेदिक दवाखान्यात थांबून गरजू रुग्णांची सेवा करण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनावेळी मंडलाधिकारी एम. एम. कुलाळ, तलाठी परदेशी, हंगामी तलाठी सुरेश बदडे, आरोग्य विस्तार अधिकारी प्रशांत सातपुते, आरोग्य सहायक विनायक कुलकर्णी, एस. डी. भंडारे, ए. डी. लाहुडकर, आरोग्य सेविका लतिका जाधव उपस्थित होत्या. शासकीय कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कोणताही त्रास दिला जाणार नाही, तळीरामांनी गोंधळ केल्यास त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल कारवाई करावी, असे आश्वासन ग्रामस्थांनी एकमुखाने दिले. म्हसवडचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. कोरे यांनी शिष्टाई केल्यामुळे अडीच तासांनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दादासाहेब शिंगाडे, भारत अनुसे, बापूसाहेब बनगर, वैभव शिंगाडे, विजयकुमार जगताप, साहेबराव खरात, सुभाष जगताप, भारत बनसोडे, अमोल जगताप, दत्ता चव्हाण, रणजित जगताप यांच्यासह चार गावांतील ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले. (प्रतिनिधी)
‘लोकमत’कडून सतत पाठपुरावा
वरकुटे-मलवडीसह चार गावांच्या समस्यांबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. दि. १७ जुलैच्या अंकात ‘तलाठ्याविना शेतकरी अडचणीत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले, तर दि. २४ जुलैच्या अंकात ‘गोदामात दवाखाना’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले.
राजकीय आधार नको!
कोणत्याही पक्षाच्या छोट्या-मोठ्या नेत्यांचा आधार झुगारून या आंदोलनात सामान्य जनता सहभागी झाली आणि राजकीय पाठिंब्याशिवाय आंदोलन यशस्वी करून दाखविले. यापुढील काळात समाजाच्या विकासासाठी सर्व जणांनी एकत्र येऊन गावाचा विकास साधायचा, असा निर्णय ग्रामस्थांनी एकमुखाने घेतला.

Web Title: Doctor, Talathi should be in Varakute-Malwadi ..! - Lokmat Ka Danka ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.