डॉक्टर, वाहनचालकांकडे कसून चौकशी

By admin | Published: September 12, 2016 01:04 AM2016-09-12T01:04:35+5:302016-09-12T01:04:35+5:30

नार्कोटिकबाबत विचारणा : परिस्थितीजन्य पुरावे ‘एसआयटी’च्या हाती

Doctor, thorough investigation of motor vehicles | डॉक्टर, वाहनचालकांकडे कसून चौकशी

डॉक्टर, वाहनचालकांकडे कसून चौकशी

Next

 कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासात पनवेल येथील ‘सनातन’च्या आश्रमातून नार्कोटिक औषधांबाबत चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या डॉक्टरासह वाहनचालकांकडे ‘एसआयटी’चे पथक कसून चौकशी करीत आहे.
डॉ. वीरेंद्र तावडे याच्या सांगण्यावरून आपण प्रत्येक आश्रमात व ज्याठिकाणी साधक मेळावे घेतले जातात त्याठिकाणी ही औषधे पुरविण्याचे काम करीत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. ही औषधे कोठून आणली, ती बनवितो कोण? याची सखोल माहिती घेतली जात असल्याचे वरिष्ठांनी सांगितले.
पानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील संशयित सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक डॉ. वीरेंद्र तावडे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गेल्या सात दिवसांच्या चौकशीमध्ये पानसरे हत्याप्रकरणाचा मास्टर मार्इंड तावडे असल्याचे परिस्थितीजन्य पुरावे ‘एसआयटी’च्या हाती आले आहेत.
पनवेल येथील आश्रमावर पथकाने छापा टाकला असता तेथून नार्कोटिक औषधांचा साठा जप्त केला. ही औषधे आश्रमात येणाऱ्या साधकांना दिली जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याचा वापर आजारासाठी की अन्य कोणत्या कारणांसाठी केला जातो, याबाबत कसून चौकशी सुरू आहे. आश्रमातील एका डॉक्टरासह वाहनचालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांनी डॉ. तावडे यांच्या सांगण्यावरून आम्ही इतर आश्रमांत ही औषधे पुरवित असल्याची कबुली दिली आहे. भूमिगत विनय पवार हा साधक बेपत्ता आहे. त्याच्या वास्तव्याची माहिती तावडेला आहे; परंतु तो त्याच्याविषयी माहिती देत नाही. रविवारी पोलिसांनी तावडेकडे कसून चौकशी केली. येत्या दोन दिवसांत यापूर्वी त्याचे वास्तव्य असलेल्या गंगावेश, शिवाजी पार्क, वारणानगर, कर्नाटक व गोवा राज्यांत तपासासाठी फिरविण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. रात्री उशिरा त्याची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करून राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी केली. (प्रतिनिधी)
तावडेला कोठडीत मोकळीकता
राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत जीवितास धोका असल्याची तक्रार डॉ. तावडे याने वकिलांकडे केली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी या कोठडीतील इतर गुन्ह्णांतील आरोपींची रवानगी करवीर पोलिस ठाण्याच्या कोठडीत केली आहे. राजारामपुरीच्या कोठडीत तावडेला पूर्ण मोकळीकता दिली आहे. तसेच त्याच्या सुरक्षेमध्येही वाढ केली आहे. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तावडेची भेट घेतली. यावेळी त्याच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्याने पोलिसांविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले.
जिवाच्या भीतीने रक्तदाब वाढला
राजारामपुरीच्या कोठडीतील अन्य गुन्ह्यांतील आरोपींकडून आपल्या जीवितास धोका असल्याची भीती तावडेला होती. त्याची शनिवारी (दि. १०) रात्री सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी केली असता रक्तदाब वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे सुमारे दोन तास त्याला याठिकाणी ठेवण्यात आले. रक्तदाब सुरळीत झाल्यानंतर त्याला तेथून हलविले.
 

Web Title: Doctor, thorough investigation of motor vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.