डॉक्टरचा खून दोन हजार रुपयांसाठी

By admin | Published: November 3, 2016 01:26 AM2016-11-03T01:26:14+5:302016-11-03T01:26:14+5:30

पाटपन्हाळातील दोघांना अटक : नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याचा राग

Doctor's blood for two thousand rupees | डॉक्टरचा खून दोन हजार रुपयांसाठी

डॉक्टरचा खून दोन हजार रुपयांसाठी

Next

कोल्हापूर : येथील डॉक्टर सतीश शांताराम देऊलकर (वय ५९) यांच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी दोघांना अटक केली. संशयित आरोपी उत्तम अण्णा देसाई (३९), तानाजी आनंदा थोरात (२६, दोघे, रा. घरपण, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. डॉ. देऊलकर यांनी मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावतो म्हणून त्यांच्याकडून दोन हजार रुपये घेतले होते. आपली फसवणूक केल्याच्या रागापोटी देऊलकर यांचा खून केल्याची उत्तम देसाई याने कबुली दिली आहे, अशी माहिती निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.
डॉ. देऊलकर गोव्याला जातो म्हणून दि. २८ आॅक्टोबरच्या रात्री घरातून बाहेर पडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. २९) कळे पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाटपन्हाळा येथील कासारी नदीच्या कोरड्या पात्रात त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. कोल्हापुरातील डॉक्टरचा पाटपन्हाळा येथे खून झाल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली होती. हा खून पैशातून झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने कळे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस तपास करीत होते.
पोलिस देऊलकर यांचे उठणे-बसणे कोठे असते, त्यांचा मित्रपरिवार कोण आहे, त्यांचा वाद कोणाशी होता, त्यांनी आर्थिक व्यवहार कोणाशी केला होता यासंबंधी माहिती घेत असताना खबऱ्याकडून पोलिस निरीक्षक मोहिते यांना उत्तम देसाई याने साथीदार तानाजी थोरात याच्या मदतीने देऊलकर यांचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्णाची कबुली दिली.
डॉ. देऊलकर हे बी. एच. एम. एस. पदवी प्राप्त केल्यानंतर आॅईल अ‍ॅँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओ.एन.जी.सी.) मध्ये डॉक्टर म्हणून नोकरी करीत होते. त्यांची व संशयितांची एक महिन्यापूर्वी लक्ष्मीपुरीत डॉ. भूपाळी यांच्या रुग्णालयाशेजारील चहाच्या टपरीजवळ ओळख झाली होती. त्यावेळी देऊलकर यांनी मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावतो असे सांगून उत्तम देसाई याच्याकडून दोन हजार रुपये घेतले होते.
त्यानंतर नोकरीच्या आमिषाने त्यांच्याकडून दारू व जेवणासाठी पैसे मागून घेतले होते. पैसे देऊनही नोकरी लावली नाही; त्यामुळे देऊलकर ही फसवणूक करणारी व्यक्ती आहे, याची त्यांना खात्री झाली. त्यांनी पैशांची मागणी केली असता देऊलकर हे टाळाटाळ करीत होते. त्यातून त्यांच्यात वादावादी झाली. दि. २८ च्या रात्री सीपीआर येथून संशयितांनी कार (एमएच ०१-एई ३६५२) मधून देऊलकर यांना केर्ली (ता. करवीर) येथे नेले. या ठिकाणी दारू पाजून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन व मोबाईल काढून घेतला. देऊलकर हे या प्रकाराची माहिती पोलिसांना देतील या भीतीने ते मलकापूर, अणुस्कुरामार्गे पाटपन्हाळा गावाजवळील कासारी नदीवरील पुलाखाली आले.
येथील कोरड्या पात्रामध्ये त्यांना मारहाण करून, डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. तपास पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक इलियास सय्यद, उपनिरीक्षक युवराज आठरे, कॉन्स्टेबल सुनील कवळेकर, सुनील इंगवले, शिवाजी खोराटे, सुरेश चव्हाण, राजेंद्र हांडे, श्रीकांत पाटील, संजय हुंबे, संजय काशीद, सुजय दावणे, राजेंद्र निगडे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
मोबाईलवर सुगावा
आरोपींनी डॉ. देऊलकर यांचा खून केल्यानंतर त्यांचा मोबाईल आपल्यासोबत ठेवला होता. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाचे कॉल डिटेल्स तपासले असता उत्तम देसाई याचे वारंवार कॉल झाल्याचे दिसून आले. दि. २८ रोजी देऊलकर हे बेपत्ता झाले त्यावेळी शेवटचा कॉल देसाई याचाच होता. यावरून त्यांनीच खून केल्याचा संशय बळावला होता. तसेच त्या दोघांची माहिती खबऱ्यानेही दिली होती.
 

Web Title: Doctor's blood for two thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.